गेवराई तालुक्यात सेल्फी काढताना भावाचा मृत्यू; बहिण रूग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:48 PM2018-01-25T23:48:16+5:302018-01-25T23:48:28+5:30
बंधा-यावर सेल्फी काढण्याच्या नादात १४ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या बहिणीची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील आगर नांदुर येथे घडली.
गेवराई (जि. बीड) : बंधा-यावर सेल्फी काढण्याच्या नादात १४ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या बहिणीची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील आगर नांदुर येथे घडली.
आमेर करीम सय्यद (१४ रा.संजय नगर, गेवराई) असे मृताचे नाव असून हिना (१८) असे त्याच्या बहिणीचे नाव आहे. करीम सय्यद व परवीन सय्यद दाम्पत्य गुरूवारी सकाळी आगर नांदुर येथील गोदावरीच्या पात्राजवळ असलेल्या पिराच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दोघे कार्यक्रमात व्यस्त असताना हिना व आमेर या दोघांना बाजूच्या बंधा-यावर जावून सेल्फीचा काढण्याचा मोह आवरला नाही.
सेल्फी काढत असतानाच आमेरचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. तो पाण्यात गटंगळ्या खात असतानाच हिनाने तत्काळ पाण्यात उडी मारली. पुरेसे पोहता येत नसल्याने ती पण गटंगळ्या खात होती. यामध्ये आमेरचा मृत्यू झाला तर हिनाला परिसरातील लोकांनी पाण्याबाहेर काढले. तिची प्रकृती गंभीर असून सुरूवातीला गेवराई व नंतर जिल्हा रूग्णालयात तिला दाखल करण्यात आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची नोंद नव्हती.
नातेवाईकांचा आक्रोश
देवाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या सय्यद दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलाच्या मृत्यूची माहिती समजताच आई-वडिलांसह नातेवाईकांनी टाहो फोडला. यामुळे परिसर सुन्न झाला होता.