पीपीई किटअभावी मृत कोरोना रुग्णांची विटंबना, दोन-तीन तास उशिराने होत आहेत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:18+5:302021-04-07T04:34:18+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत माजलगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण मिळून त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत माजलगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण मिळून त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही मागील १५-२० दिवसांतही कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात निघत आहे. यातही मृतांची संख्या वाढली आहे. या मृत पावलेल्या रुग्णांवर येथील नगरपालिकेने अंत्यसंस्कार करण्यासाठी एक पथक नेमले होते. या पथकाने शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयातील कोरोना बाधित मृत पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी या पथकावर होती.
या पथकाने मृत पावलेल्या रुग्णांचा मृतदेह एका किटमध्ये पॅक करून त्याच्या अंत्यसंस्काराला लागणारे साहित्य आणून त्यावर अंत्यसंस्कार करायचे. त्यावेळी पथकात असलेल्या कर्मचाऱ्यांना घालायला
पी.पी.ई.किट देणे जरुरी आहे. हे किट नगरपालिकेने विकत घेऊन त्यांना द्यायला हवेत. मात्र, येथील नगरपालिकेने आतापर्यंत एकही किट विकत घेतलेले नसून हे किट आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असल्याचे नगरपालिकेचे कर्मचारी सांगताना दिसतात.
येथील शासकीय व खासगी रुग्णालय मृत पावलेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी या पथकाकडून शासकीय आरोग्य विभागाकडून पी.पी.ई.किट मिळत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येत नसल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळत आहे. यामुळे अंत्यसंस्कार करण्यास उशीर होत असल्याचे दिसून येते. अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारे विधीसाहित्यदेखील संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून घेतले जात असल्याचे मृत व्यक्तीचे नातेवाईक सांगत आहेत.
पहिल्या लाॅकडाऊनमध्ये शासनाने नगरपालिकेला कसल्याही प्रकारच्या प्रशासकीय मान्यतेशिवाय खर्च करण्याचे आदेश दिलेले असताना येथील नगर पालिका मात्र दुसऱ्याच्या जीवावर अंत्यसंस्कार करताना दिसत आहे. यामुळे येथील नगर पालिकेचे आयजीच्या जीवावर बायजी उधार असे धोरण झाले आहे. यामुळे नगरपालिकेच्या विरोधात नागरिकांतून रोष निर्माण होताना दिसत आहे.
आम्हाला टेंडर काढावे लागेल
पी.पी.ई.किट घेण्यासाठी आम्हांला निधी खर्च करण्यास अडचणी येत असून यासाठी आम्हांला टेंडर काढावे लागेल. त्यामुळे आम्ही आरोग्य विभागाकडून किट घेऊन अंत्यसंस्कार करीत आहोत.
- विशाल भोसले, मुख्याधिकारी, न.प. माजलगाव
मृत व्यक्तीला बांधण्यासाठी लागणारे किट व त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना पी.पी.ई.किट मागितल्यावर आम्ही देतो.
- डाॅ. गजानन रुद्रवार, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय
मृत व्यक्तीला बांधायला लागणारे किट व त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना पी.पी.ई.किट नगरपालिकेनेच पुरवठा करणे आवश्यक आहेत.
-डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी