धास्तीमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:55+5:302021-06-09T04:41:55+5:30
तालुक्यातील थेटेगव्हाण येथील एका साठ वर्षीय व्यक्तीचा आरटीपीसीआर अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार ती व्यक्ती कोविड सेंटरवर ...
तालुक्यातील थेटेगव्हाण येथील एका साठ वर्षीय व्यक्तीचा आरटीपीसीआर अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार ती व्यक्ती कोविड सेंटरवर उपचार घेण्यासाठी निघाली. दरम्यान, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही बाब कोविड केअर सेंटरवरील डॉ. अमोल दुबे व डॉ. तफीक तांबोळी यांनी तपासल्यानंतर स्पष्ट झाली. त्यानंतर या रुग्णाच्या दफनविधीचा विषय पुढे आला. कोविडमुळे मृत झालेल्या रुग्णाच्या दफनविधीसाठी सोय नसल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर हे प्रकरण जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे गेले. थेटेगव्हाण हे पहाडी पारगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने या ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली दफनविधी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मृतदेह हाताळणीबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या नव्या नियमानुसार नातेवाइकांकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला. मात्र, या घोळात चार ते पाच तास नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागली. शासनाचे सर्व कोविड नियमांचे पालन करून दफनविधी करण्यात आला. मात्र, दफनविधीच्या अंतिम क्षणापर्यंत संबंधित ग्रामसेवक उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे तक्रार केली.