गंभीर रुग्णाचा उपचाराविना मृत्यू; निरोप भेटूनही उशिरा आलेले वैद्यकीय अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 01:00 PM2020-10-21T13:00:16+5:302020-10-21T13:02:57+5:30
suspension of Doctor डॉक्टर दोन तास उशिराने आल्याने कोरोना संशयित रुग्ण दगावला
बीड : कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची प्रकृती अचानक गंभीर झाली. याबाबत संबंधित डॉक्टरला कॉल केला. त्यांनंतरही ते दोन तास उशिराने पोहचले. तोपर्यंत रुग्ण दगावला होता. याची तक्रार करताच कामचुकारपणा करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब टाक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
साधारण महिन्यांपूर्वी एक रुग्ण कोरोना संशयित म्हणून दाखल झाला. त्याची चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. असे असले तरी त्याची प्रकृती अचानक खालावली. याबाबत कर्तव्यावर असणारे फिजिशियन डॉ बाळासाहेब टाक यांना कॉल करून बोलावण्यात आले. तरीही ते वेळेत आले नाहीत. नातेवाईकांनि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांना फोन करून कल्पना दिली. डॉ थोरात यांनी सांगूनही ते उशिराने पोहचले. तोपर्यंत रुग्ण दगावला होता. यामुळे नातेवाईक आक्रमक झाले होते. याची तक्रार करताच समिती बसवून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सर्व माहिती उपसंचालक यांच्या मार्फत आयुक्त, प्रधान सचिव यांना पाठवली. यात डॉ टाक दोषी असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कामचुकपणा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शासकीयकडे दुर्लक्ष; खाजगीवर भर
जिल्हा रुग्णालयातील बहुतांश वैद्यकीय अधिकारी हे खाजगी सराव करतात. सरकारी रुग्णलयातील रुग्णाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या खाजगी दवाखान्यात अधिक वेळ बसतात. रुग्णाची पळवापळवी देखील केली जाते. यासाठी काही दलालांचीही नियुक्ती केली आहे. त्यांना कमिशन दिले जात असल्याचेही समोर आले होते. आशा प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयाबद्दल तक्रारी वाढल्या होत्या. त्यातच वेळेवर उपचार मिळत नसल्याची ओरडही येत होती, याला आता या कारवाईमुळे दुजोरा मिळाला आहे. परंतु तक्रार केल्यास कारवाई होते, हे देखील सिद्ध झाले आहे.
हलगर्जीपणा व दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई
कॉल देऊनही दोन तास उशिरा डॉ टाक हे सरकारी रुग्णलयात दाखल झाले होते. याबाबत तक्रार येताच चौकशी करून वरिष्ठांना अहवाल दिला होता. यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या नेहमी सोबत असू, पण रुग्ण सेवेत हलगर्जी व दुर्लक्ष करणाऱ्याला कधीच पाठीशी घातले जाणार नाही.
- डॉ अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड