पंप चोरी करताना विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:05 AM2019-07-04T00:05:45+5:302019-07-04T00:06:19+5:30
२७ जून रोजी खून करुन प्रेत विहिरीत टाकल्या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात आठ लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अंभोरा पोलिसांनी तपास चक्र फिरताच या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली असून तो खून नसून तर विद्युत मोटार चोरी करण्यासाठी गेला आणि विहिरीत पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कडा : २७ जून रोजी खून करुन प्रेत विहिरीत टाकल्या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात आठ लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अंभोरा पोलिसांनी तपास चक्र फिरताच या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली असून तो खून नसून तर विद्युत मोटार चोरी करण्यासाठी गेला आणि विहिरीत पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी फिर्यादीवर पोलिस प्रशासनाला वेठीस धरुन वेळ वाया घालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील वाटेफळ, खुटेफळ येथील पारधी समाजाचा छगन उर्फ मेहमान काळे याला घरातून गुरुवारी (दि. २७) पहाटे चारचाकी गाडीत घालून मारहाण करुन विहिरीत टाकले होते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा अंभोरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक कुकलारे यांनी कर्मचारी सोबत घेऊन माहिती घेण्यास सुरुवात केली असता, तो खून नसून मयत हा रोहित भोसले, अमोल भोसले या दोन मामाच्या मुलांना घेऊन हातोळण येथील शेतकऱ्याच्या विहिरीवरील विद्युत मोटार चोरण्यासाठी गेला होता, अशी माहिती मिळाली. त्यावेळी त्याचा पाय घसरला व तो घसरून विहिरीत पडला, यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा वाचवायला गेलेला त्याचा मामाचा मुलगा रोहित देखील गंभीर जखमी झाला तर अमोल याने घरी येऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर घरच्यांनी एकत्र बसून हे प्रकरण कसे दडपायचे यासाठी नियोजीत प्लॉन केला व खून झाल्याचे बनाव केला होता.
या प्रकरणी अमोल, रोहित यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा हा प्रकार समोर आल्याने या घटनेने वेगळे वळण घेतले. या प्रकरणी पोलिसांना वेठीस धरले व वेळ वाया घालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.