लोणी शिवारात पाच मोरांसह एका होल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:35 AM2021-01-23T04:35:06+5:302021-01-23T04:35:06+5:30
शिरूरकासार : तालुक्यातील लोणी शिवारात शुक्रवारी सकाळी एकाच वेळी चार मोरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याची ...
शिरूरकासार : तालुक्यातील लोणी शिवारात शुक्रवारी सकाळी एकाच वेळी चार मोरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच वन विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पथक जाण्यापूर्वीच चार मोरांचा मृत्यू झाला होता तर पाचव्या मोराचाही पथकासमक्ष तडफडून मृत्यू झाला. मोरांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी नमुने पुण्याला पाठवण्यात आले.
तालुक्यात गुरुवारपर्यंत २१ कावळे, तीन चिमण्या मरण पावल्या. तर शुक्रवारी पाच मोरांच्या मृत्यूने पक्षी जातीवर अकाली मृत्यूचे सावट पसरल्याची भीती व्यक्त होत आहे. लोणी शिवारात येताळा महानोर व अंबादास केदार यांचे माळसोंड नामक शेतात मोर तडफडून मरण पावल्याची घटना प्रत्यक्षदर्शी साहित्यिक डॉ .भास्कर बडे यांनी संबंधित लोकांना सांगितली. घटनेचे गांभिर्य ओळखून वनपरिक्षेत्र अधिकारी सायमा पठाण यांनी वनरक्षक बद्रिनाथ परझणेसह शिवाजी आघाव, सुनील आघाव यांना तातडीने घटनास्थळी पाठविले. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रदीप आघाव, वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे, लोणीचे सरपंच विठ्ठल बडे हेही घटनास्थळी पोहोचले. यावेळी पाच मोर मृत पावले. जवळच होला नावाचा एक पक्षीदेखील मरण पावल्याचे दिसून आले. तपासणी अहवालानंतरच मोरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे डॉ. प्रदीप आघाव यांनी सांगितले.