घर पाडण्याची नोटीस मिळताच विष प्राशन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू, जिल्हा रूग्णालयाजवळ तणाव
By सोमनाथ खताळ | Updated: June 17, 2023 19:31 IST2023-06-17T19:28:01+5:302023-06-17T19:31:48+5:30
रूग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती.

घर पाडण्याची नोटीस मिळताच विष प्राशन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू, जिल्हा रूग्णालयाजवळ तणाव
बीड : गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची नोटीस प्रशासनाने दिल्यानंतर भारत अवचार (वय ५५ रा.इंदिरानगर, बीड) याने विष प्राशन केले होते. अवचार यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर विविध संघटनांसह नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण होते. घटनास्थळी पाेलिस दाखल झाले आहेत.
बीड शहरातील इंदिरानगरसह विविध भागातील रहिवाशांना घरे तोडण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. याच नोटीसांचा धाक घेऊन इंदिरानगरमधील भारत विठ्ठल आवचार यांनी बुधवारी पहाटे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार होते. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात विविध संघटनांसह नातेवाईकांनी धाव घेतली. ठिय्या मांडत प्रशासन आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. यामुळे रूग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती.