विष प्राशन केलेल्या मुलीचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:37 PM2019-04-09T23:37:16+5:302019-04-09T23:38:02+5:30

तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे गावातीलच रिक्षा चालकाने छेड काढल्याने वैतागलेल्या मुलीने ३ एप्रिल रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला.

The death of the poisoned girl after the treatment | विष प्राशन केलेल्या मुलीचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू

विष प्राशन केलेल्या मुलीचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू

Next
ठळक मुद्देरिक्षाचालकाने काढली होती छेड : नातेवाईकांचा पोलीस चौकीसमोर ठिय्या

बीड : तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे गावातीलच रिक्षा चालकाने छेड काढल्याने वैतागलेल्या मुलीने ३ एप्रिल रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. मुलावर आगोदरच गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्याच्या आई-वडिलांवरही गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस चौकीसमोर ठिय्या मांडला होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांनी माघार घेतली.
छाया संपत राठोड (१७, रा. अंथरवन पिंपरी, ता.बीड) असे मयत मुलीचे नाव आहे. तर प्रताप भानुदास पवार (२५) असे आरोपीचे नाव आहे. छाया गावातीलच महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील उसतोड कामगार आहेत. १५ दिवसांपूर्वीच ते गावी परतले होते. मागील काही महिन्यांपासून प्रताप हा छायाचा पाठलाग करून छेड काढत होता. या त्रासाला छाया वैतागली होती.
यातूनच तिने ३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरात विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार आईने पाहिल्यानंतर तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. मात्र, तिचीही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि मंगळवारी पहाटे तिने अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच छायाचे वडील संपत पवार यांच्या जबाबावरून प्रताप विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. छायाचा मृत्यू झाल्यानंतर प्रतापच्या आई-वडिलांनी सहकार्य केले म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस चौकीसमोर ठिय्या मांडला. काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सपोनि श्रीकांत उबाळे, पोउपनि श्रीराम काळे यांनी धाव घेत नातेवाईकांच्या मागणीप्रमाणे कारवाई करून आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर छायाचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेत गावी अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. याप्रकरणाचा तपास पोउपनि श्रीराम काळे हे करीत आहेत.
मुलानेही घेतले विष : उपचार सुरुच
घटनेच्या दिवशीच छायाने विष प्राशन केलेल्याचे समजताच प्रतापनेही विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर त्यालाही जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. आजही त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
आपले छायावर प्रेम होते, आम्ही लग्नही करणार होतो, मात्र घरच्यांनी विरोध केला. छायाला घरच्यांनी मारहाणही केली. घरच्यांकडून लग्नाला विरोध होत असल्याने आणि मारहाण झाल्यानेच छायाने आत्महत्या केली. आणि ती जगली नाही, तर माझा काय उपयोग, असे म्हणत आपणही विष घेतल्याचे प्रताप सांगत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, सत्य परिस्थिती तपासात समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The death of the poisoned girl after the treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.