एकाच मोबाईलवरुन धनंजय मुंडे आणि छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
By सोमनाथ खताळ | Published: July 11, 2023 04:44 PM2023-07-11T16:44:47+5:302023-07-11T16:46:18+5:30
परळीत गुन्हा दाखल, मुंडेंच्या कार्यालयात कॉल करून मागितली ५० लाख रूपयांची खंडणी.
सोमनाथ खताळ
बीड : शरद पवार यांना सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनासोबत युती केलेल्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुडे व छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोघांनाही कॉल करणार मोबाईल क्रमांक एकच आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडे ५० लाख रूपयांची खंडणीही मागण्यात आली आहे. याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर धमकी देणाऱ्या महाड येथील व्यक्तिला पुणे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज्यात सध्या फुटीचे राजकारण सुरू आहे. आगोदर उद्धव ठाकरे यांच्यापासून एकनाथ शिंदे यांचा गट बाजूला झाला तर आता राष्टवादीत शरद पवार यांच्यापासून अजित पवार यांचा गट दुर झाला. शिवाय अजित पवारांचा गट भाजप व शिवसेना सरकारमध्ये सामील झाला. अजित पवारांना उपमुख्यमंत्री तर इतर ९ जणांना मंत्रीपदेही मिळाली. यातीलच धनंजय मुंडे व छगन भूजबळ यांना एका मोबाईल क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धनंजय मुंडे यांच्या परळीतील संपर्क कार्यालयात सोमवारी मध्यरात्री १२ वाजता हा कॉल आला. मी धनंजय मुंडे यांना जीवे मारणार असून मला सुपारी मिळाली आहे. मला ५० लाख रूपये द्या असे म्हणत समोरच्या व्यक्तीने खंडणी मागितली. त्यानंतर वाल्मीक कराड यांनी परळी शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी मोबाईल क्रमांकावर गुन्हा दाखल झाला आहे.
धमकी देणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात
भूजबळ आणि मुंडे यांना धमकी देणारा व्यक्ती हा महाड येथील आहे. त्याने दारूच्या नशेत हा प्रकार केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. परंतू धमकीनंतर लगेच पुणे शहर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तर परळीत गुन्हा दाखल होताच परळीचे पोलिसही पुण्यात पोहचले आहेत. तेथील कारवाईनंतर आरोपीला परळी शहर पोलिस ताब्यात घेणार असल्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप यांनी सांगितले. तसेच दोघांनाही ज्या क्रमांकावरून कॉल आले, तो एकच असल्याचेही सानप म्हणाले.