परळीत पेटवून दिलेल्या महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:10 AM2017-12-03T00:10:02+5:302017-12-03T00:10:10+5:30
परळी शहरातील अशोकनगर इराणी वस्ती येथील भाजलेल्या महिलेचा दहा दिवसानंतर उपचारादरम्यान अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणात तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून आता त्यात खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे.
परळी : शहरातील अशोकनगर इराणी वस्ती येथील भाजलेल्या महिलेचा दहा दिवसानंतर उपचारादरम्यान अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणात तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून आता त्यात खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे.
शेख शबाना शेख महेबूब (२०) ही महिला राहत्या घरी जळाल्याची घटना घडली होती. तिला अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेले होते. सुरुवातीस या महिलेने अंधश्रद्धेतून स्वत:ला जाळून घेतल्याची चर्चा होती. मात्र जळीत महिलेने तालुका न्यायदंडाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे नोंदवलेल्या जवाबावरुन चार आरोपींनी तिला पेटवून दिले असल्याचे समोर आले. याप्रकरणी संभाजीनगर ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी जिनत, मखमल, ईरफान व जहीर सर्व (रा. इराणी गल्ली, परळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या मध्ये आरोपी हे चोरी करण्याच्या सवयीचे असून चोरीचा माल घरात ठेवू दिला नाही म्हणून दोन आरोपींनी घरातील कॅन्डमधील रॉकेल ओतून पेटवून दिले. तसेच दोन आरोपींनी लेकरांना व पतीलाही मारुन टाकू अशा धमक्या दिल्या असल्याचे फिर्यादीत जळीत महिला शेख शबाना शेख महेबूब हिने जबाबात म्हटलेले आहे.
दरम्यान, परळीतील या बहुचर्चित जळीत प्रकरणाला वळण आले असून यातील जळीत महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपींवर लावलेल्या कलमात वाढ होत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. अंबाजोगाई येथे शवविच्छेदन करण्यात आले असून याप्रकरणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर यातील आरोपींच्या गुन्हे कलमात वाढ होईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र, अद्यापही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आलेले नाही.