स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाचा ग्रंथालयात ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 05:58 PM2019-01-25T17:58:50+5:302019-01-25T18:03:13+5:30

अभ्यास करून मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न अपुरेच राहिले

The death of a young man preparing for a competitive exam has been hit by heart attack in Beed | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाचा ग्रंथालयात ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाचा ग्रंथालयात ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू

googlenewsNext

बीड : अभ्यास करून मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न एका युवकाचे अकाली निधनामुळे अपुरेच राहिले. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना रिडींगमध्ये ह्रदयविकाराचा धक्का आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना बीड शहरातील शाहूनगर भागात गुरूवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. अवघ्या २५ वर्षी युवकाचा ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

गंगाभिषण दत्तात्रय राऊत (२५, पिंपरखेड, ता.वडवणी) असे मयत तरूणाचे नाव आहे. गंगाभिषण हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. सध्या तो बीड शहरातील शाहुनगर भागात किरायाची खोली करून मित्रांसह राहत होता. गुरूवारी तो वडवणी येथे बँकेच्या कामासाठी गेला होता. दुपारी बीडला आल्यानंतर त्याने आराम केला आणि नंतर सहा वाजता पुन्हा अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी गेला. याचवेळी त्याला अस्वस्थता जाणवू लागली आणि अचानक चक्कर येऊन तो जागेवर कोसळला. बाजुच्या विद्यार्थ्यांनी त्याला तात्काळ जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यांनी जिल्हा रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. शुक्रवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी त्याच्या पार्थिवावर पिंपरखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रूग्णालय पोलीस चौकीत आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. 

दरम्यान, अवघ्या २५ व्या वर्षी ह्रदयविकाराचा धक्का येण्याचे प्रकार क्वचित होतात. असे आजार साधारण ३५ ते ५५ वर्ष वयाच्या लोकांना जास्त होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. मात्र गंगाभिषणच्या मृत्यूने हा धक्का कोणत्याही वयात येऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे.

डॉक्टरांनी व्हिसेरा ठेवला राखीव
गंगाभिषणचे शवविच्छेदन जिल्हा रूग्णलयात करण्यात आले. यावेळी येथील डॉक्टरांनी त्याचा व्हिसेरा राखीव ठेवला आहे. त्याला किडणी व ह्रदयाचा आजार असू शकतो. प्रथमदर्शनी त्याचा ह्रदयविकारानेच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून याला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दुजोराही मिळाला आहे.

अधिकारी बनण्याचे स्वप्न अधुरेच
गंगाभिषणचे आई-वडील शेतकरी आहेत. तर बहिणीचे लग्न झालेले असून एक छोटा भाऊ आहे. तो अभ्यासाबरोबरच शेतातही मदत करीत होता. त्यामुळे अनेकवेळा तणावात असे. मात्र हा तणाव झुगारून तो अभ्यास करायचा. त्याला मोठा अधिकारी बनून आई-वडिलांचे नाव मोठे करायचे होते, मात्र अकाली निधनाने त्याचे हे स्वप्न अधुरेच राहिले.

Web Title: The death of a young man preparing for a competitive exam has been hit by heart attack in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.