कर्ज वाटप करणे बॅँकेचे कामच, कोणाला फसविलेले नाही-सारडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:58 PM2019-08-22T23:58:00+5:302019-08-22T23:59:00+5:30
कर्ज वाटप करणे हे बँकेचे कामच असते, ते आम्ही केले आहे. यासंदर्भात काही तक्र ारी असतील तर त्यासाठी सहकार कायदा आहे.
बीड : कर्ज वाटप करणे हे बँकेचे कामच असते, ते आम्ही केले आहे. यासंदर्भात काही तक्र ारी असतील तर त्यासाठी सहकार कायदा आहे. आम्ही त्या चौकशीला सामोरे जात आहोत. मात्र त्यासाठी आमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊच शकत नाही. मात्र केवळ शब्दांचा खेळ करून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातून आपल्याला डिस्चार्ज करावे, अशी विनंती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष सारडा यांनी गुरुवारी न्यायालयाला केली.
जिल्हा बँकेने अंबाजोगाई कारखान्यास दिलेल्या कर्ज प्रकरणात दाखल गुन्ह्यातून आपल्याला वगळण्यात यावे अशी याचिका सुभाष सारडा यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी. कचरे यांच्या न्यायालयात केली असून या प्रकरणात त्यांनी स्वत: युक्तिवाद केला.
गुरुवारी त्यांचा युक्तिवादाचा तिसरा दिवस होता. यावेळी सारडा यांनी, कर्ज वाटप करणे हे बँकेचे कामच असते, ते आम्ही केले आहे. यात आम्ही कोणाला फसवले नाही. अंबाजोगाई कारखान्याच्या संचालकांना आम्ही ओळखतही नाही, केवळ जिल्ह्यातील ५० वर्षांपासूनची संस्था टिकावी हाच कर्ज देण्यामागचा हेतू होता. आम्ही ९ टक्क्यांनी ठेवी स्वीकारतो आणि १७ टक्क्यांनी कर्ज देतो. यात बँकेचे हित आणि उत्कर्षच पाहिला आहे. आमच्या काळात बँकेची प्रगतीच झाली आहे. त्यामुळे फसवणूक, संगनमत हे आरोप मुळातच कपोकल्पित आहेत. आमच्या कोणत्याही संचालकाच्या खात्यावर कोणाकडूनही एक रुपयाही आला नाही, त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा देखील लागू होत नाही . तसेच ठेवीदारांचे हित साधणाऱ्या कायद्याच्या कक्षेत बँक येतच नाही, त्यामुळे आपल्यावर ठेवण्यात आलेला कोणताच आरोप ठेवता येत नाही. बँकेसाठी स्वतंत्र सहकार कायदा असून त्याच्याअंतर्गत चौकशीसाठी आपण तयार आहोत, सामोरे जात आहोत, म्हणून या गुन्ह्यातील आरोपांमधून आपल्याला डिस्चार्ज करण्यात यावे असे सारडा म्हणाले. यातील सारडा यांचा युक्तिवाद संपला असून यात आता अभियोग पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालय निकाल सुनावणे अपेक्षित आहे.