बोगस पदोन्नतीबाबत होणार आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:29 AM2018-10-22T00:29:47+5:302018-10-22T00:30:38+5:30
सेवा ज्येष्ठतेमध्ये बसत नसताना व अधिकृतपणे निवड झालेली नसताना बोगस पदोन्नती घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या धारुर तालुक्यातील पाच शाळांच्या मुख्याध्यापकांची २२ आॅक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष सुनावणी होणार आहे.
अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सेवा ज्येष्ठतेमध्ये बसत नसताना व अधिकृतपणे निवड झालेली नसताना बोगस पदोन्नती घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या धारुर तालुक्यातील पाच शाळांच्या मुख्याध्यापकांची २२ आॅक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष सुनावणी होणार आहे. जिल्ह्यातील बोगस पदोन्नतीचा लाभ उचलणाºया मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, प्राथमिक पदवीधरांच्या संदर्भात ‘लोकमत’ने २१ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करुन जिल्हा परिषद प्रशसनाचे लक्ष वेधले होते.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर यांच्या कार्यकाळात पदोन्नतीचे आदेश देण्यात आले होते. यात ५ मुख्याध्यापक, ४ केंद्रप्रमुख, ३ प्राथमिक पदवीधरांचा समावेश होता. विशेष म्हणजे हे शिक्षक सर्व शिक्षा अभियानासाठी घेण्यात आले होते. सेवा ज्येष्ठता सूची तसेच पदोन्नती समिती नसताना त्यांना पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या. दरम्यान ही बाब नियमबाह्य असल्याचे लक्षात येताच हे आदेश आपण दिलेले नाहीत व तसे असेल तर परत घेतो असे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी स्पष्ट केले. याच कालावधीत इतर काही शिक्षकांना विस्तार अधिकारी तर काहींना ज्येष्ठता यादीत नसताना प्राथमिक पदवीधर म्हणून नियमबाह्य पदोन्नत्या देण्यात आल्या. त्यामुळे पात्र शिक्षकांवर पदोन्नतीच्या बाबतीत अन्याय झाला.
शिक्षण विभागातून आदेश प्राप्त करत हे १२ शिक्षक चार वर्षांपासून नियमबाह्यपणे अद्यापही काम करत होते. त्यांनी असे आदेश कसे व कोठून मिळाले, याचा शोध घेण्याची गरज लोकमतने २१ आॅगस्ट रोजीच्या बातमीत नोंदविली होती. पाच मुख्याध्यापकांना प्राप्त आदेश खरे की खोटे याबाबत सुनावणीत संपूर्ण माहिती पुढे येणार आहे.
नियमबाह्य आदेशाने पदोन्नतीचे लाभ भोगणाºया शिक्षकांना आतापर्यंत कोणाचे अभय मिळाले, वरिष्ठांपासून ही माहिती कशी काय दडविली ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच मुख्याध्यापकांच्या सुनावणीनंतर विस्तार अधिकाºयांची देखील सुनावणी होणार असल्याचे अधिकारिक सूत्रांनी सांगितले.
धारुर तालुक्यातील ५ मुख्याध्यापक
धारूर तालुक्यातील गावंदरा प्राथमिक शाळेचे (आंबेवडगाव केंद्र) मुख्याध्यापक आश्रुबा रावसाहेब तिडके, देवदहिफळ केंद्रांतर्गत चाटगाव येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन मुंडे, आंबेवडगाव केंद्रांतर्गत चारदरी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्ता घोळवे, धारुर केंद्रांतर्गत घागरवाडा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामहरी गांधले, व धारुर येथील कन्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर शिंदे या पाच जणांना सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. पदोन्नतीने मुख्याध्यापकपदी निवडीबाबत ठोस पुरावे तसेच लेखी म्हणणे सादर करण्याबाबत सुचित केले आहे.