ढिसाळ कारभार, रुग्णालय इमारतीबाबत निर्णय रेंगाळलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:49+5:302021-01-02T04:27:49+5:30
बीड : आदित्य शिक्षण संस्थेतील जिल्हा रुग्णालय स्थलांतरित करा, याबाबत पत्र दिल्यानंतरही आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून काहीच उपाययोजना ...
बीड : आदित्य शिक्षण संस्थेतील जिल्हा रुग्णालय स्थलांतरित करा, याबाबत पत्र दिल्यानंतरही आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांची भेटच नाही. त्यामुळे यावर चर्चा झालीच नाही, असे सांगण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला शिक्षण संस्था इमारत रिकामी करण्याच्या निर्णयावर ठाम आहे.
कोरोनामुळे जिल्हा रुग्णलयातील ओपीडी व आयपीडी विभाग नाळवंडी नाका येथील आदित्य शिक्षण संस्थेतील इमारतीत हलविण्यात आला होता. परंतु, एप्रिल महिन्यापासून इमारतीची कसलीही देखभाल केली नाही. तसेच वीजबिलही आरोग्य विभागाने भरले नाही. याबाबत शिक्षण संस्थेने वारंवार पत्रव्यवहार केला. तरीही यावर काहीच उपाययोजना झाल्या नाहीत. अखेर संस्थेने या ढिसाळ कारभाराला वैतागून इमारत रिकामी करण्यास सांगितले. १ जानेवारीची मुदत दिली होती. अचानक बाहेर निघा म्हटल्यानंतरही आरोग्य विभाग, प्रशासनाकडून काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. यावरून प्रशासन आणि आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार कशाप्रकारे चालतो, हे समजते. अधिकाऱ्यांनाही याचे कसलेच गांभीर्य नसल्याचे दिसते.
कोट
मी सध्या बाहेरगावी आलेले आहे. संस्थेसाेबत अद्याप कसलीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे आमचा निर्णय अद्यापही ठाम आहे. बिल भरून आणि दुरूस्तीचा खर्च द्यावा. आता महाविद्यालयेही सुरू झाले आहेत. त्यामुळे इमारत रिकामी करावी.
आदिती सारडा
संचालिका, आदित्य शिक्षण संस्था, बीड
कोट
इमारत रिकामी करण्याबाबत अद्याप कसलाच निर्णय झालेला नाही. बिल भरलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांची भेट झालेली नाही. त्यांच्याशी चर्चा झाल्यावर पुढील निर्णय घेऊ.
डॉ.सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड