बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेची शोले स्टाईल आंदोलनातून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 05:45 PM2023-08-28T17:45:39+5:302023-08-28T17:46:03+5:30
बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
- नितीन कांबळे
कडा: जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांनी माना टाकल्या असून जिल्हाभर दुष्काळाच्या झळा आहेत. राज्य शासनाने तत्काळ बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी मनसेकडून पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी तहसीलदार बाळदत्त मोरे निवेदन दिले. यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर, उपजिल्हाध्यक्ष सतिष शिंदे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब दिंडे,उपतालुकाध्यक्ष मच्छिंद्र गरजे,उपतालुकाध्य सुनिल पाचपुते, अक्षय मडके, भरत चव्हाण आदींचा सहभाग होता.
काय आहेत मागण्या
निवेदनात बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी व पूढील काळात शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी हरीण, रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा प्रतिबंध करावा, जिल्हयातील पिके वाळत असल्याने पिक विमा कंपनीने जिल्हाभरातील शेतकऱ्यांना पिकविम्याची २५% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी, ९९२ व इतर सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकणाऱ्या बिजोत्पादन कंपन्यावर कडक कार्यवाही करावी तसेच खत बीयाण्याची लिंकीग, चढयादराने खत बियाण्याची व किटकनाशकाची विक्री करणाऱ्या कृषी दुकानदारांवर कार्यवाही करावी, गोगलगाय व इतर रोगांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, माजी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांची शिफारस स्वीकारुन त्यानुसार खरीप व रब्बी पेरणीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत देण्यात यावी, प्रचंड नूकसान होऊनही पिकविमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देत नाहीत, अशा कंपन्यांना काळ्या यादीत टाकून कडक कायदेशीर कारवाई करावी.