दुष्काळात तेरावा; विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:45 AM2019-07-11T00:45:38+5:302019-07-11T00:46:09+5:30
खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
बीड : खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. दुष्काळाने होरपळलेल्या शेतक-यांच्या जखमेवर विमा कंपनी मीठ चोळण्याचे काम करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतक-यांनी ५३ कोटी ६६ लाख ६१ हजार रूपयांचा पीक विमा भरला होता. ७८४०२२ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. पैकी आतापर्यंत ९ लाख ३९ हजार ५८५ शेतकºयांना विमा मिळाला आहे. याची रक्कम ६४७ कोटी २९ लाख ३१ हजार एवढी आहे. अद्यापही ४ लाख ७२ हजार २८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. अगोदरच दुष्काळात होरपळलेल्या शेतक-यांना पीक विमा भरल्यानंतरही तो मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्या शेतकºयांनी विमा भरल्यानंतरही त्यांना मिळाला नाही, ते ओरिएन्टल इन्शुरन्स या कंपनीकडे विचारणा करण्यासाठी जातात. मात्र, येथील अधिकारी, विमा प्रतिनिधी शेतकºयांना अरेरावी करण्यासह त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने या कंपनीकडून शेतकºयांची थट्टा मांडली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, तालुक्याच्या ठिकाणी विम्यासंदर्भात तक्रारी सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. मात्र, या समितीकडून शेतकºयांच्या तक्रारींचे निरसण केले जात नाही. तालुक्याच्या ठिकाणी निरसन होत नसल्याने शेतकरी बीडच्या मुख्य शाखेत येतात, येथील अधिकारी आमच्याकडे काही नाही, तुम्ही तालुका विमा प्रतिनिधीशी संपर्क साधा म्हणून कार्यालयातून काढता पाय घेण्याचे सांगत आहेत. या दोन्ही कोंडीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे अगोदरच दुष्काळ आणि त्यात विमा कंपनीकडून थट्टा केली जात असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळीच विम्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकºयांनी दिला आहे.
सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा
जिल्ह्यात ४ लाख ७६ हजार ५६८ शेतक-यांनी सोयाबीनचा विमा भरला. पैकी १ लाख ३१ हजार ६२८ शेतकºयांना २४६ कोटी ३४ लाख रूपयांचा विमा मिळाला आहे.
अद्यापही ३ लाख ४४ हजार ९४० शेतकºयांना विमा मिळालेला नाही. कंपनीला विचारणा केल्यास येईल-येईल, असे उत्तरे देतात, तर कृषी विभागाकडून आम्हाला याची काही माहिती नाही, असे सांगून हात झटकले जात आहेत.