महिलांसाठी १०० बेडच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:34 AM2021-05-12T04:34:04+5:302021-05-12T04:34:04+5:30
परळी : कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा व आधार देण्यासाठी परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सेवाधर्म या उपक्रमांतर्गत ...
परळी : कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा व आधार देण्यासाठी परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सेवाधर्म या उपक्रमांतर्गत पंचायत समिती शासकीय निवासस्थान येथे उभारलेल्या महिलांसाठीच्या स्वतंत्र १०० बेडच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी येथे उपलब्ध सर्व सुविधांची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
या कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक स्टाफ उपलब्ध करून दिला असून, परळीतील डॉ. गुरुप्रसाद देशपांडे व डॉ. आनंद टिंबे व इतर काही डॉक्टर्सदेखील येथे सेवा देणार आहेत. सेवाधर्म अंतर्गत शहरातील फूड प्लाझा येथे राष्ट्रवादी आधार केंद्र उभारले असून, याद्वारे आवश्यक तिथे निर्जंतुकीकरण फवारणी, नागरिकांना लसीकरणासाठी मदत, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हे मदत केंद्र कार्यरत राहणार आहे.
यावेळी कोरोना बाधित व गरजू मिलिंद घाटे, उत्तम बोराडे व बळीराम आटोळे या तीन कुटुंबातील विवाहकार्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये मदतीचा धनादेश पालकमंत्री मुंडेंच्या हस्ते देऊन उद्घाटन झाले. परळीतील विविध रुग्णालयात काम करत असलेल्या ५०० कोरोना योद्ध्यांना मोफत भोजन डबे देण्यास सुरुवात झाली.
सेवाधर्म अंतर्गत प्रत्येक खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मोफत जेवण देण्यात येते. जेवण, रेमडेसिविर इंजेक्शन अन्य औषधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. यापैकी २५ स्वयंसेवकांना मंगळवारी कोरोना कवच किटचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. पल्स ऑक्सिमीटर, जलनेती पात्र, मास्क, सॅनिटायझर, साबण आदी बाबींचा त्यात समावेश आहे. परळीतील सर्व कोरोना योद्ध्यांना हे किट देण्यात येत आहे.
यावेळी मुंबई कृ.उ.बा.स.चे सभापती अशोक डक, शिवाजी शिरसाठ, नगरपालिका गटनेते वाल्मिक कराड, नगराध्यक्षा सरोजनी हालगे, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, कृ.उ.बा.स. सभापती ॲड. गोविंदराव फड, राजाभाऊ पौळ, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शहर सरचिटणीस अनंत इंगळे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार रुपनर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे, बाल रोग तज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. आनंद टिंबे, नगरसेवक राजा खान, गोविंद मुंडे, नगरसेवक राजेंद्र सोनी, चेतन सौंदळे, विजय भोयटे, जयदत्त नरवटे आदी उपस्थित होते.
===Photopath===
110521\img-20210510-wa0510_14.jpg