शेजाऱ्याने बांधकामासाठी खोदला खोल खड्डा; चार मजली इमारत त्यात पत्त्यासारखी कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 06:51 PM2022-06-09T18:51:23+5:302022-06-09T18:55:07+5:30
शेजारच्या इमारतीचे खोदकाम भरपूर खोल असल्याने बाजूची इमारत एका बाजूला झुकल्याचे नागरिकांना दिसून आले.
बीड : शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रेहमत नगर येथील एका घराचे बांधकाम करण्यासाठी खूप खोल खड्डा खोदल्याने शेजारी असलेली चार मजली इमारत अक्षरक्षः पत्त्यासारखी कोसळल्याची घटना बुधवारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. झुकलेली इमारत पडण्यापूर्वीच नगर परिषद विभागातील कर्मचाऱ्यांनी वेळीच या भागातील एसबीआय बँक, दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या तर प्रभावित इमारतीशेजारीत घरातील नागरिक इतर ठिकाणी हलविण्यात आल्याने जीवितहानी टळली. या प्रकरणाची गंभीर दखल नगर पालिकेने घेतली असून, प्रत्येक बाजूने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
रेहमत नगर येथे अब्दुल जमाल अब्दुल गणी यांच्या चारी मजली इमारतीचे काम सुरू आहे तर त्यांच्या बाजूला शेख हारुण शेख ईसाक यांच्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात येत आहे. हे खोदकाम भरपूर खोल असल्याने बाजूची इमारत एका बाजूला झुकल्याचे या भागातील नागरिकांना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास दिसून आले. काही लोकांनी या घटनेची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासन, नगर पालिका प्रशासन व पोलिसांना दिली. माहिती प्राप्त होताच नगर परिषद मुख्याधिकारी उमेश ढाकणे, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांच्यासह कर्मचारी घटनास्थळावर तत्काळ गेले. परिस्थिती पाहता, अग्निशमन विभागालाही बोलाविण्यात आले. इमारत एका बाजूला झुकलेली असल्याने ती काही वेळातच पडेल, असा अंदाज असल्याने कर्मचाऱ्यांनी या भागातील एसबीआय बँक, दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच जवळपासच्या घरातील सदस्यांनाही इतरत्र जाण्याचे सांगण्यात आले. वेळीच सावधानता बाळगल्याने एकही जीवितहानी झाली नाही. मात्र, जवळच्या एका घरावर इमारतीचा काही भाग पडल्याने किचन व एका रूमचे नुकसान झाले.
बीड शहरातील चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली...#beedpic.twitter.com/mTiJx6SNR0
— Lokmat (@lokmat) June 9, 2022
चौकशी झाली सुरू
शहरातील मुख्य भागात इमारत कोसळलेल्या घटनेची गंभीर दखल नगर पालिकेने घेतली आहे. दोन्ही जागा मालकांना नोटीस बजावली आहे. नगर रचनाकार यांच्याकडून इमारत बांधण्याचा परवाना घेतला आहे का ?, कोणत्या इंजिनिअरच्या अधिपत्याखाली हे बांधकाम सुरू होते ? यासह इतर प्रश्न नोटिसीद्वारे विचारण्यात आले आहेत. दोघांकडून नोटिसीचे उत्तर मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट
इमारत कोसळलेल्या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच या घटनेचा अहवाल देऊन कारवाईच्या सूचना नगर परिषद मुख्याधिकारी ढाकणे यांना देण्यात आल्या आहेत. तसेच बीड तहसीलदार सुहास हजारे यांनीही वेळीच नगर परिषद व शासकीय यंत्रणांना सूचना दिल्या.