बीड जिल्ह्यात पाच केंद्रांवर प्रसुतीची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:52 AM2017-12-12T00:52:08+5:302017-12-12T00:52:22+5:30
बीड जिल्ह्याच्या कानाकोप-यातून गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात यावे लागत होते. परंतु आता हे अंतर कमी करून जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, केज व नेकनुरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून प्रसुतीची तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्याच्या कानाकोप-यातून गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात यावे लागत होते. परंतु आता हे अंतर कमी करून जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, केज व नेकनुरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून प्रसुतीची तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये नॉर्मल व सिझरचीही व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे तात्काळ उपचार मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय अशा ६५ केंद्रांवर स्त्री रोग तज्ज्ञांकडून गर्भवती महिलांवर तपासणी व उपचार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी खाजगी डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या संकल्पनेतील ही संकल्पना आता राज्यासाठी एक मॉडेल ठरू पहात आहे. यामुळे आरोग्य विभागाची प्रतीमाही उंचावली आहे.
दरम्यान, जिल्हा रूग्णालय वगळता इतर शासकीय रूग्णालयांमध्ये सिझरची सुविधा उपलब्ध नव्हती. प्रसुती म्हणलं की नागरिकही महिलांना थेट जिल्हा रूग्णालयात आणत. यामध्ये त्यांना मोठ्या ‘कळा’ सहन कराव्या लागत होत्या. हाच धागा पकडून जिल्ह्यात चार सेंटर सुरू करुन रूग्णांना तात्काळ व जवळच उपचार मिळण्याबरोबरच त्यांची प्रसुती सुरक्षित व्हावी, यासाठी तज्ज्ञांची टिम नियूक्त केली आहे. गेवराई, केज, माजलगाव व नेकनुर येथेच महिलांची प्रसुती करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.
आयुक्तांचे चॅलेंज स्वीकारले
आरोग्य आयुक्त डॉ.संजिव कुमार यांनी पुणे येथील दोन सेंटरवर प्रती महिन्याला २५ महिलांचे सिझर व १२५ महिलांची नॉर्मल प्रसुती होते. राज्यात हे अव्वल असल्याचे सांगितले. असे सर्व जिल्ह्यांमध्ये होणे अपेक्षित आहे, असे आयुक्तांनी सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना विचारले होते. यामध्ये बीडचे सीएस डॉ.थोरात यांनी ‘आय अॅक्सेप्टेड चॅलेंज’ असे म्हणून हे चॅलेंज स्विकारले आहे. आता यामध्ये त्यांना किती यश येते, हे वेळच ठरवेल.
३१ डिसेंबरला अहवाल देऊ
गेवराई, माजलगाव, नेकनुर व केजमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती करून तेथेच प्रसुतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रूग्णांना जिल्हा रूग्णालयात येण्याची गरज नाही. प्रत्येक महिन्याला या चार सेंटरमध्ये २५ सिझर व १२५ नॉर्मल प्रसुती करून दाखवू. आमची टिम कामाला लागली आहे. ३१ डिसेंबरला आम्ही अहवाल देऊ.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, जि.रू.बीड