कृषीकर्ज देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:00+5:302021-05-18T04:35:00+5:30
ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे बीड : खरीप हंगाम तोंडावर आल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पशुधनबाजार बंद ...
ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे
बीड : खरीप हंगाम तोंडावर आल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पशुधनबाजार बंद आहे. त्यामुळे बैलाची खरेदी व विक्री बंद झाली आहे. परिणामी बैलाद्वारे केली जाणारी मशागतीची कामे अडचणीत आली आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरवर ही कामे सुरू आहेत.
कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला
बीड : लसीकरण असो अथवा कोरोना, रुग्णांवरील उपचार या दोनही कामात आरोग्य कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे. सध्या तालुक्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लस पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होऊ लागली आहे. याचा आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण वाढू लागला आहे. नागरिकांनीही आपले कर्तव्य समजून लसीकरणास सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
संरक्षक भिंतीचा वापर जाहिरातीसाठी
बीड : शहरात असणाऱ्या विविध शासकीय कार्यालये, विविध संस्था, शाळा यांच्या संरक्षक भिंतीवर विविध क्लासेस व विविध कंपन्यांच्यावतीने संरक्षक भिंती रंगवून या भिंतीचा वापर जाहिरातबाजीसाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अशाप्रकारच्या जाहिराती करण्यास निर्बंध घालणे गरजेचे झाले आहे. चांगल्या भिंतीचे विद्रुपीकरण करण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण
बीड : सर्वच ठिकाणचे पाण्याचे स्तोत्र कमी होत आहेत. येथील वनविभागातील जलस्त्रोतही वाढत्या उन्हाने आटत चालले आहेत. त्यामुळे वन विभागातील वन्य प्राणी पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. पाण्याच्या शोधार्थ हे प्राणी अनेकदा दूरवर जात आहेत. आहे या पाणवठ्यात पाण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबेल, अशी मागणी होत आहे.