नुकसान भरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:46 AM2021-01-08T05:46:45+5:302021-01-08T05:46:45+5:30
धारूर-आसोला रस्त्याची दुरवस्था धारूर : धारूर ते असोला या आठ किलोमीटर रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ...
धारूर-आसोला रस्त्याची दुरवस्था
धारूर : धारूर ते असोला या आठ किलोमीटर रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक व प्रवासी वैतागून गेले आहेत. या रस्त्यावरील खड्डे तत्काळ प्रशासनाने बुजवावेत तसेच वाहनांचे होणारे नुकसान व अपघात टाळावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
स्थलांतराने रोहयो कामे घटली
अंबाजोगाई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असलेल्या कामांना मागणी घटली असल्याचे चित्र आहे. सध्या शेतात मोठ्या प्रमाणात मशागतीची कामे, काढणी, मोडणी, ऊस लागवड सुरू असल्याने शेतमजुरांना शेतावरच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. तर ग्रामीण भागातील बहुतांश मजुरांनी ऊसतोडणीसाठी कारखान्याकडे स्थलांतर केले आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. ऊसतोड मजुरांच्या स्थलांतरामुळे हे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
अनुदानासाठी निराधारांची गर्दी
धारूर : येथे तहसील कार्यालयातून निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. हे अनुदान मिळण्यासाठी निराधारांनी टपाल कार्यालयात गर्दी केली आहे. सकाळपासूनच निराधारांच्या रांगा लागलेल्या असतात. गर्दीमुळे निराधारांना ताटकळावे लागत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : शहर व परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा शहरी व ग्रामीण भागाला मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू झाल्याने पिकांना पाणी देणे सुरू आहे. शहरी भागात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वीज ग्राहकांमधून केली जात आहे.