बीडच्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांची मागणी; आम्हाला आणखी कर्ज पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:26 AM2018-01-15T00:26:49+5:302018-01-15T00:29:19+5:30

मागील पाच वर्षांत १०२५ शेतक-नी मृत्यूस कवटाळले. त्या सर्व पात्र-अपात्र शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये त्यांना कुठल्या योजनांची अन् सुविधांची गरज आहे, याची माहिती घेतली असता घरकुलाच्या योजनेसह आणखी कर्ज द्या, अशी मागणी या कुुटुंबियांकडून केली जात असल्याचे ‘मिशन दिलासा’ सर्वेक्षणातून समोर आले आहे. गत दोन महिन्यांपूर्वी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

The demand of the families of Beed's suicide victims; We Need More Loans! | बीडच्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांची मागणी; आम्हाला आणखी कर्ज पाहिजे!

बीडच्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांची मागणी; आम्हाला आणखी कर्ज पाहिजे!

googlenewsNext

सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड :
मागील पाच वर्षांत १०२५ शेतक-यांनी मृत्यूस कवटाळले. त्या सर्व पात्र-अपात्र शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये त्यांना कुठल्या योजनांची अन् सुविधांची गरज आहे, याची माहिती घेतली असता घरकुलाच्या योजनेसह आणखी कर्ज द्या, अशी मागणी या कुुटुंबियांकडून केली जात असल्याचे ‘मिशन दिलासा’ सर्वेक्षणातून समोर आले आहे. गत दोन महिन्यांपूर्वी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

दोन महिन्यांपूर्वी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांची माहिती घेण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे प्रत्येक शेतक-याच्या कुटुंबासाठी एक अधिकारी नेमला. यामध्ये प्रामुख्याने कृषी, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महसूलच्या अधिकाºयाचा समावेश होता. १५ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी हे सर्वेक्षण करण्यात आले. हा अहवाल ७ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला होता.

सर्वेक्षणात या गोष्टींची घेतली माहिती
आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील सदस्य संख्या, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला का, मिळाला तर कोणत्या योजनांचा? त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देता येतो का? मुलांचे शिक्षक, त्यांचे उत्पन्न आदींची माहिती संकलित केली होती. तसेच कर्जाच्या सद्य:स्थितीचा आढावाही घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांची मागणी काय आहे, सध्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे, मूलभूत सुविधांचा लाभ मिळतो का, याचीही माहिती घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले होते. त्याप्रमाणे माहिती घेण्यात आली.

५ वर्षांत १०२५ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला
मागील पाच वर्षांत गेवराई तालुक्यात सर्वाधिक २१९ शेतकºयांनी जीवन संपविले. त्यानंतर बीड २१६, केज ११८, अंबाजोगाई १०६, पाटोदा ६९, परळी ६०, शिरूर ५९, धारूर ५८, वडवणी ४४, माजलगाव ४०, आष्टी ३६ अशा एकूण १०२५ शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले.

जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक
सर्वेक्षणानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या प्रमुखांची बैठक घेऊन या योजनेचा लाभ देण्यासंदर्भात आदेश दिले. त्याप्रमाणे कामकाज सुरूही झाले. आता दुसºया टप्प्यात किती शेतकºयांना योजनांचा लाभ दिला याबाबत लवकरच बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.योजनांचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना तात्काळ लाभ द्यावा, अशी मागणीही जोर धरु लागली आहे.

३१८ घरी चुलीवरच भाजतेय भाकरी
पूर्वी शहरात आणि आता ग्रामीण भागातही आता घरोघरी गॅस जोडणी आहे; परंतु ३१८ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांकडे अद्यापही गॅस जोडणी नाही. ही जोडणी देण्याची मागणी त्यांनी केली. त्यात बीड तालुका आघाडीवर आहे.

वीज जोडणीची मागणी
अनेकांच्या शेतात पाणी आहे, परंतु हक्काची वीज नाही. २९८ शेतकरी कुटुंबियांनी शेतात वीज जोडणी करुन देण्याची मागणी केली आहे. यात बीड तालुक्यातील सर्वाधिक ११७ शेतकºयांच्या कुटुंबियांचा समावेश असल्याचे समजते.

२१५ घरांमध्ये अंधार
अद्यापही २१५ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या घरात वीज जोडणीअभावी अंधार आहे. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न बिकट झाला आहे. हाच धागा पकडून बीड तालुक्यातील ११० कुटुंबियांसह जिल्ह्यात २१५ जणांनी घरी वीज जोडणी देण्याची मागणी केली आहे. बीडनंतर गेवराई, पाटोदा, शिरुर कासार व वडवणी तालुक्याचा क्रमांक लागतो.

६५२ जणांना घरकुलाची गरज
अनेकांची घरे आजही पत्र्याची अन् कुडाची आहेत. दुष्काळ व नापिकीमुळे हाती पैसा आला नाही, रोजचे पोट भरणे मुश्किल झाले. अशात घर बांधायचे कसे, असा प्रश्न या कुटुंबियांना पडला आहे. कर्ती व्यक्ती गेल्यानंतर घर बांधायचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यामुळे आम्हाला घरकुल द्या, अशी मागणी ६५२ शेतकरी कुटुंबियांनी केली. बीड १८१, गेवराई १७७, शिरूर १०, आष्टी २८, पाटोदा, माजलगाव ३८, धारूर ५४, वडवणी २५, केज ७, अंबाजोगाई २४, परळी ४४ अशी संख्या आहे.

४६० जणांना हवे आणखी कर्ज
अगोदरच कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्याने घरातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केली. हे कर्ज माफ करून पुन्हा कुटुंबाला सक्षम करण्यासाठी शासनाने आणखी कर्ज द्यावे, अशी मागणी ४६० शेतकºयांनी केली आहे. यामध्ये गेवराई १५५, बीड ६८, शिरूर २०, आष्टी २५, पाटोदा ५४, माजलगाव १, धारूर ५४, वडवणी ३०, अंबाजोगाई ५२ व परळी १ यांचा समावेश आहे.

आमच्या आरोग्याचीही घ्या काळजी
बिकट आर्थिक परिस्थितीमुळे या शेतकºयांना खाजगी दवाखान्यात जाता येत नाही. सरकारी दवाखान्यात दर्जेदार उपचार मिळत नाहीत. त्यामुळे आमच्या आरोग्यविषयक उपचाराची काळजी घ्या, अशी मागणी १८० शेतकरी कुटुंबियांनी केली आहे. बीड, गेवराई तालुका यामध्ये आघाडीवर आहे.

शौचालय बांधून द्यावे...
बिकट आर्थिक परिस्थितीमुळे या शेतकºयांना खाजगी दवाखान्यात जाता येत नाही. सरकारी दवाखान्यात दर्जेदार उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे आमच्या आरोग्यविषयक उपचाराची काळजी घ्या, अशी मागणी १८० शेतकरी कुटुंबियांनी केली आहे.

५१२ जणांना केली विहिरीची मागणी
अनेकांकडे शेती आहे, पण पाणी नाही. कोरडवाहू शेतीत अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नाही. पेरणीसाठी लागलेला खर्च पदरी पडत नाही. शेती जलयुक्त करण्यासाठी ५१२ कुटुंबियांनी विहिरींची मागणी केली आहे. यात बीड १७७, गेवराई ११८ हे तालुके आघाडीवर आहेत, तर १२९ कुटुंबियांनी शेततळ्यांची मागणी केली.

अन्न सुरक्षा योजनेचा लाभही नाही
१०२५ पैकी ३८१ कुटुंबियांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा लाभ देण्याची मागणी बीड तालुक्यातील १४२, केज ११८ सह ३८१ कुटुंबियांनी केली.

सक्षमतेसाठी वेतन द्या
संजय गांधी योजनेअंतर्गत वेतन दिले तर आम्ही सक्षम होऊ, असा खुलासा ४५४ कुटुंबियांनी केला आहे. इतर योजनांचाही लाभ द्यावा, असे १८० कुटुंबियांची मागणी आहे.

वसतिगृहाची मागणी
४परिस्थितीमुळे शहराच्या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी जाता येत नाही. राहण्याची सोय नसल्याने अनंत अडचणी येतात. आमच्या मुलांना वसतिगृहाची सुविधा द्या, अशी मागणी २३४ कुटुंबियांनी केली. यात बीड व गेवराई आघाडीवर आहे.

Web Title: The demand of the families of Beed's suicide victims; We Need More Loans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.