पिकविमा तात्काळ वाटप करण्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:30+5:302021-05-22T04:31:30+5:30
देशातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्याच्या नावाखाली खाजगी विमा कंपन्या कसे मालामाल होत आहेत हे सिद्ध झाले. २०२० ते ...
देशातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्याच्या नावाखाली खाजगी विमा कंपन्या कसे मालामाल होत आहेत हे सिद्ध झाले. २०२० ते २०२१ या वर्षातील नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास पाच हजार कोटीचा नफा विमा कंपनीला झालेला आहे असे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे १.१९ कोटी शेतकरी या योजनेत सहभागी आहेत. ६४.८५ लाख कोटी हेक्टर संरक्षित क्षेत्र वसुल विमा हप्ता ५८०१ कोटी, फक्त १२.३० लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, त्यात नुकसान भरपाई म्हणून फक्त ८२३ कोटी रुपये वाटप व ४९६९ कोटी रूपये विमा कंपनीला झालेला फायदा आहे. ही सर्व आकडेवारी पाहुन प्रधानमंत्री पिकविमा योजना नेमकी शेतकऱ्यांसाठी आहे का, पिकविमा कंपनीसाठी आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर आळणे यांनी केंद्रीय कृषीमंत्री यांना केला आहे.
आज सर्व जिल्ह्यात अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याबद्दल कोणीही आवाज उठवायला तयार नाही, उठवला तरी काही फरक पडतांना दिसुन येत नाही, हे सर्व बाजुला ठेऊन केंद्र सरकारने जाचक अटी रद्द करून प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबवावी व झालेली पिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परमेश्वर आळणे यांच्यासह शेतकरी वर्गातून होत आहे.