दोनशे फूट उंचीच्या टॉवरवर चढून मराठा आरक्षणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:37 AM2018-08-11T00:37:26+5:302018-08-11T00:38:00+5:30
अंबाजोगाई (जि. बीड) : तालुक्यातील धानोरा (बु) येथील श्रीकांत पंडित सोमवंशी (४५) हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी सायंकाळी दोनशे फूट उंचीच्या विद्युत पॉवर ग्रीड टॉवरवर चढल्याने खळबळ उडाली.
उपस्थित शेकडो ग्रामस्थ सूर्यवंशींना खाली या, खाली या असे आवाहन करत होते. जोपर्यंत माझा प्रशासनाशी संपर्क होणार नाही, तोपर्यंत मी खाली उतरणार नाही, असा हट्ट सूर्यवंशी हे धरून बसल्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. महावितरणने परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसिलदार संतोष रूईकर, पोलीस कर्मचारी, अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
स्वामी यांनी सूर्यवंशी यांना विश्वासात घेत आपण टॉवरवरून खाली येऊन म्हणने मांडावे असे सूचित केले. तासाभराने सोमवंशी खाली उतरले. त्यामुळे शेकडो उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवंशी यांना खाली उतरल्यानंतर लगेचच स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी त्यांचे म्हणने ऐकून घेणार आहेत.