रस्त्यांवर नामफलक लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:42+5:302021-09-22T04:37:42+5:30
पदोन्नती करण्याची मागणी अंबाजोगाई : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बदली करण्यापूर्वी पदोन्नती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी वारंवार केली आहे. मात्र, ...
पदोन्नती करण्याची मागणी
अंबाजोगाई : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बदली करण्यापूर्वी पदोन्नती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी वारंवार केली आहे. मात्र, या मागणीकडे आजपर्यंत दुर्लक्षच करण्यात आले आहे. आता या प्रश्नावर कर्मचारी संघटना बैठक घेत असून बदल्यांआधी पदोन्नती करण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वाढत्या वीज बिलांमुळे ग्राहक त्रस्त
अंबाजोगाई : महावितरण कंपनीकडून वारंवार वीज दरवाढ, अतिरिक्त शुल्क तर कधी अतिरिक्त सुरक्षा रकमेचे देयके पाठविली जात आहेत. या मनमानी कारभाराने त्रस्त असलेल्या वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ही वाढती महागाई व सतत वाढत जाणारी वीज बिले यामुळे वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. शासनाने या संदर्भात ठोस उपाययोजना कराव्यात. वीजग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कल्याण काळे यांनी केली आहे.
रस्त्यावरील सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे नागरिकांत रोष आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : तालुक्यातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
अंबाजोगाई : परिसरातील अनेक गावांतील शौचालयामध्ये गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत जनजागृती केली जात नसल्याने शौचालयाचा गैरवापर होत आहे.