परळीत रेडिओ सेंटरची मागणी जोर धरू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:39 AM2021-09-24T04:39:18+5:302021-09-24T04:39:18+5:30
परळी : आकाशवाणी केंद्राचे एफ एम, रेडिओ मिर्ची तसेच लोकल रेडिओ स्टेशन सुरू करावे, या मागणीसाठी म.गांधी जयंतीनिमित्त २ ...
परळी : आकाशवाणी केंद्राचे एफ एम, रेडिओ मिर्ची तसेच लोकल रेडिओ स्टेशन सुरू करावे, या मागणीसाठी म.गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी उच्च शक्ती दूरदर्शन केंद्र पिंपळा (धा.) येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी दिली.
परळी-अंबेजोगाई धार्मिक, पुरातत्त्व, सांस्कृतिक, सामाजिक, एेतिहासिक,औद्योगिक व राजकीयदृष्ट्या मराठवाड्यातील महत्त्वाची शहरे आहेत. परंतु या ठिकाणी इतर एफ. एम. केंद्राचे प्रसारण स्पष्ट ऐकू येत नाही. त्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम, रेडिओ मिर्ची तसेच लोकल रेडिओ स्टेशन सुरू करण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी शिफारस करण्याची मागणी नगरसेवक चेतन सौंदळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
उच्च शक्ती दूरदर्शन प्रक्षेपण बंद होणार
अंबेजोगाई तालुक्यातील पिंपळा (धा.) येथे १९९१ साली सुरू झालेल्या उच्च शक्ती दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राद्वारे प्रसारित होणारे नॅशनल व डी.डी. न्यूज चॅनेल भारत सरकारने बंद केले आहे. तांत्रिकदृष्ट्या वैधता संपत असल्यामुळे उच्च शक्ती दूरदर्शन प्रक्षेेपण केंद्रही ३१ ऑक्टोबर २०२१ पासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारती दूरदर्शन महानिर्देशालयाने २० सप्टेंबर २०२१ च्या पत्राद्वारे दिले आहेत.
स्थानिक कलाकारांना मिळेल वाव
या ठिकाणी पायाभूत सुविधा,जागा तसेच आवश्यक कर्मचारी उपलब्ध असल्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफएम-रेडिओ मिर्ची व लोकल रेडिओ स्टेशन सुरू करून तांत्रिकदृष्ट्या लागणारे साहित्य उपलब्ध करावे. अशा प्रकारचे केंद्र सुरू केल्यास स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळेल, मराठवाड्यातील बीड,लातूर,उस्मानाबाद,परभणी,नांदेड जिल्ह्यातील लाखो श्रोत्यांना, प्रवासी पर्यटकांना एफएम केंद्राद्वारे सादर होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल, असे निवेदनात म्हटले आहे.