शीवरस्ता दुरूस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:13+5:302020-12-24T04:29:13+5:30
ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अंबाजोगाई : यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. झालेल्या पावसाने अजूनही ...
ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल
अंबाजोगाई : यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. झालेल्या पावसाने अजूनही नदीचे पाणी वाहत आहे. परिसरातील छोटे-मोठे तलाव तुडुंब भरले आहेत. विहिरी, इंधन विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी वाढले. एकंदरीत सर्वत्र पाणीसाठा उपलब्ध झाल्याने परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सध्या शेतकरी नगदी पीक म्हणून उसाला प्राधान्य देत असल्याने या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
भारनियमन बंद करा
अंबाजोगाई : ग्रामीण भागात करण्यात येणारे भारनियमन बंद करावे. यावर्षी रबी हंगाम चांगल्या प्रमाणात येत आहे. पाण्याची उपलब्धता आहे. मात्र, वीज पुरवठा ठप्प राहतो. तर भारनियमनाचा कालावधी मोठ्या प्रमाणात असल्याने उपलब्ध असूनही पिकांना पाणी देता येत नाही. शासनाने भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी केली आहे.
महामार्गावर रिफ्लेक्टर बसवावेत
अंबाजोगाई -: अंबासाखर ते लातूर या राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यासाठी या रस्त्यावर रिफ्लेक्टर बसवावेत व आवश्यक तिथे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी केली आहे.
वन्य प्राण्यांचा उपद्रव
अंबाजोगाई -: अंबाजोगाई तालुक्यात डोंगराळ भागात हरिण, रानडुक्कर, लांडगा या प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रामुख्याने रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रानडुकरांकडून पिकांचे नुकसान होत आहे. या वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. या प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करणे मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे. या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनात
अंबाजोगाई -: अंबाजोगाई तालुक्यात सध्या कापसाची वेचणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अतिवृष्टीनंतर दिवाळीच्या हंगामात कापूस मोठ्या प्रमाणात बहरला. मोठ्या प्रमाणात कापूस बहरल्याने सर्वांची वेचणी एकदाच सुरू झाली. प्रत्येकजण आपआपल्या शेतात कापूस वेचणीसाठी जात असल्याने मोठ्या शेतकऱ्यांना शेतात कापूस वेचण्यासाठी मजूर उपलब्ध होईनात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बसस्थानकात गर्दी वाढली
अंबाजोगाई -: बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही वाढला आहे. बसस्थानकात दिवाळीनंतर आपआपल्या गावी जाण्यासाठी पाहुण्यांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दी होत असली तरी बसस्थानकात सामाजिक अंतर, मास्कचा वापर याबाबत कसलीही दक्षता बाळगण्यात येत नाही. मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा सुरूच आहे. ही वाढती गर्दी कोरोनासाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.