अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडे २१ कोटी ५५ लाखांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:26+5:302021-09-17T04:40:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेती वाहून जाणे, जनावरांचा व व्यक्तीचा मृत्यू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेती वाहून जाणे, जनावरांचा व व्यक्तीचा मृत्यू अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे या नुकसानभरपाईपोटी व मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून २१ कोटी ५५ लाख ९५ हजार रुपयांच्या अनुदानाची मागणी नैसर्गिक आपत्ती विभागाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे सुरूच असून, अहवाल आल्यानंतर नुकसानभरपाई किती मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये जवळपास १८४ मालमत्तांचे नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड होऊन काही व्यक्तींचा मृत्यूदेखील झाला होता. त्याचसोबत ७१ लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला होता तर २,५२५ कोंबड्या अतिवृष्टीत दगावल्या आहेत. ओढे, नद्या व तळे फुटून जवळपास ५ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यापोटी शासनाकडे २० कोटी १५ लाख २६ हजार ८७५ रुपयांची मागणी करण्यात आली आहे. इतर नुकसानापोटी १ कोटी ४० लाख ६८ हजार अशी मिळून २१ कोटी ५५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हे अनुदान तत्काळ मिळावे, अशी मागणी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांमधून केली जात आहे.
शेती पिकांचे नुकसान सर्वाधिक
जिल्ह्यातील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खरीप हंगामातील पिकांना व फळबागांना बसला आहे. त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून त्याचा अहवालदेखील शासनाकडे पाठवावा, अशी मागणी होत आहे. पुढील दोन दिवसात यासंदर्भात अहवाल तयार होऊन नुकसानभरपाई रकमेची मागणी शासनाकडे जिल्हा प्रशासन करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली आहे.