सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:31 AM2021-02-12T04:31:56+5:302021-02-12T04:31:56+5:30
विषाणूजन्य आजाराने उपचारास गर्दी अंबाजोगाई : हवामानातील बदलाने अंबाजोगाई शहर व परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. या ...
विषाणूजन्य आजाराने उपचारास गर्दी
अंबाजोगाई : हवामानातील बदलाने अंबाजोगाई शहर व परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. या साथीमुळे लहान बालके, ज्येष्ठ नागरिक यांना या साथीचा मोठा त्रास होत असून रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढू लागली आहे. सध्याच्या हवामानातील बदलाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
वीजचोरी वाढली ; महावितरणचे दुर्लक्ष
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावात नेहमी वीजपुरवठा खंडित होण्यामध्ये वाढ झाली आहे. याकडे महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.
पाणंद रस्ता दुरुस्तीची मागणी
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील या रस्त्याची दुरूस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
नदीत झुडपे वाढल्याने पात्र अरुंद
चौसाळा : बीड तालुक्यातील कुंभारी, सात्रापोत्रा, पालसिंगण या गावांतून वाहणाऱ्या गणेश नदीपात्रात झाडाझुडपांची संख्या वाढली आहे. तसेच वाळू उपशामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून, ओढ्यासारखे दिसत आहे. यामुळे नदीपात्रातील झाडेझुडपे कमी करून स्वच्छतेची मागणी केली जात आहे. परंतु, अद्यापही याकडे दुर्लक्षच केले जात आहे.
वाहतूक कोंडीचा त्रास
बीड : शहरातील भाजीमंडईत वर्दळ वाढली आहे. येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.