कोरोना योद्धयांचे पगार वेळेवर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:37+5:302021-04-21T04:33:37+5:30
गेवराई : कोरोना रोगाच्या काळात जिवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका, सेवक, ...
गेवराई : कोरोना रोगाच्या काळात जिवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका, सेवक, कर्मचारी यांचा पगार गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दहा ते पंधरा तारखेला होत असल्याने व विमा, बँकांचे हप्ते भरताना व्याज व दंड भरावा लागत आहे. त्यामुळे वेळेवर वेतन अदा करण्याची मागणी परिचारिका, सेवकांसह या विभागातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
आरोग्य विभागातील अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, शिपाई आदी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहेत. मात्र, त्यांनाच आता वेतनासाठी भांडण्याची वेळ आली आहे. त्यांचे वेतन चार ते पाच तारखेला होत असते. मात्र, आता गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे वेतन पंधरा ते सोळा तारखेला होत असल्याने आर्थिक अडचण निर्माण होऊन विमा व बँकेचे हप्ते उशिरा भरावे लागत असल्याने व्याजाचा किंवा दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना एरियर्स जानेवारी २०२१ पर्यंत देण्यात आला, आरोग्य कर्मचाऱ्यांना अद्याप एरियर्स मिळालेला नाही. शासनाने पगार वेळेवर करून आम्हा कोरोना योद्धयांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.