तारा दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:33 AM2021-01-20T04:33:54+5:302021-01-20T04:33:54+5:30
अंबाजोगाई : तालुक्यातील घाटनांदूर परिसरातील धर्मापुरी, उजनी, पूस आदी ग्रामीण भागात विद्युत खांब वाकले आहेत. तसेच अनेक ठिकाणी तारा ...
अंबाजोगाई : तालुक्यातील घाटनांदूर परिसरातील धर्मापुरी, उजनी, पूस आदी ग्रामीण भागात विद्युत खांब वाकले आहेत. तसेच अनेक ठिकाणी तारा सैल किंवा लोंबकळत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तारांना ताण देऊन दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली.
भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ
पाटोदा : शहर व परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. घरांसमोर कोणी नसल्याचा फायदा घेत चोरटे हात साफ करतात. वापरासाठी आवश्यक परंतु फारशी किंमत नसल्याने लोकही तक्रार करत नाहीत. घरास कुलूप लावून बाहेर पडणे जोखमीचे झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
बेलगाव, काळेगाव परिसरात वाळू चोरी
बीड : केज तालुक्यातील बेलगाव, काळेगाव परिसरातील नदी पात्रातील गावामध्ये व गावाबाहेर वाळू साठे करून वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. या वाळू माफियांवर कारवाई न करता महसूल, पोलीस प्रशासन गप्प दिसत आहे. वाळूचे अवैध उत्खनन जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने करून चढ्या भावाने वाळू विक्री केली जात आहे. या वाळू चोरांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम
बीड : शूरवीर महाराणा प्रताप सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीडमध्ये विविध कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन करताना करण्यात आले. यावेळी महाराणा प्रताप बटालियन बीडचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणसिंह ठाकूर, शिवसेनेचे बाळासाहेब पिंगळे, युवा नेते झुंजार धांडे, सुरेश शेटे, बाबा पंडित पवार, गणेश तपसे, परदेशी, बाबूराव घोरपडे, जमदाडे, नवनाथ राव, ॲड. सरफराज, गुजर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.