मताधिकार वापरला तरच लोकशाही भक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:17 AM2019-01-26T00:17:31+5:302019-01-26T00:18:00+5:30
नागरिकांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने वापरला पाहिजे व आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी तसेच योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नागरिकांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने वापरला पाहिजे व आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी तसेच योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले. ते राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमास जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, प्राचार्य भालचंद्र कराड, आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले, लोकशाहीच्या मजबुती करणासाठी मतदाराची भूमिका बजावतांना प्रत्येक मतदाराने आपली जबाबदारी ओळखावी असे सांगून मतदानाचे महत्व स्पष्ट केले. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे, आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच निवडणूक आयोगाने सोशल मिडियाचा मोठया प्रमाणात वापर करुन विविध माध्यमातून माहिती उपलब्ध करुन दिली आहे त्याचा उपयोग नागरिकांनी व मतदारांनी करावा. येणाऱ्या निवडणुकीत मतदानामध्ये पारदर्शकता यावी यासाठी व्हीव्हीपॅट मशिनचा वापर होणार आहे याची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. १८ वर्ष पुर्ण झालेल्या प्रत्येक युवक, युवतीने मतदार यादीत नाव नोंदणी करावी व मतदानाचा हक्क बजवावा, असेही ते यावेळी म्हणाले.
मतदार जागृतीसाठी काढली रॅली
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ केली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण धरमकर,तहसिलदार अविनाश शिंगटे, शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, शिक्षणाधिकारी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीमध्ये बीड येथील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, अधिका-यांचा सहभाग नोंदविला.