डेंग्यू डोके वर काढतोय; धारूरमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थाचा डेंग्यूमुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 02:21 PM2021-08-20T14:21:02+5:302021-08-20T14:22:44+5:30
Death due to Dengue : मंगळवारी डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते
धारूर ( बीड ) : अभियांत्रिकीचे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा डेंग्यूमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओम जगताप असे विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. जगताप कुटूंबियांवर ओढावलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
धारुर शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू आजाराची साथ सुरु आहे. कसबा विभागात डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. या भागातील नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला याची माहिती दिली आहे. डेंग्यूमुळे यापूर्वीही या भागात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील अॉपरेटर बाबासाहेब उर्फ नाना जगताप याच भागात राहतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा त्यांचा मुलगा ओमला (१९ ) मंगळवारी डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याची प्रकृती खालावली. अधिक उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली.
ओम पत्रकार सुर्यकांत जगताप यांचा पुतण्या होत. अतिशय शिस्तप्रिय, अभ्यासू, शांत व संयमी स्वभावामुळे ओमची वेगळी ओळख होती. आज सकाळी ९ वाजता धारुर येथील स्मशानभुमीत त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अकाली निधनामुळे सर्वस्तरातून दुःख व्यक्त होत आहे