दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बीडहून 'आदिशक्तींचे पंढरपूरकडे' प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 07:02 PM2024-07-05T19:02:45+5:302024-07-05T19:03:22+5:30
दोन दिवसांच्या संत सहवासाने बीड शहर झाले 'शक्तिमय'
- समर्थ भांड
बीड : खान्देशातून मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेने निघालेला आदिशक्ती मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा बीड शहरात दोन दिवस मुक्कामी थांबल्यानंतर शुक्रवारी पंढपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. शुक्रवारी सकाळी जैन भवन येथे हरिनामाच्या गजरात आजोबा गोविंदपंत व मुक्ताबाईंच्या पादुकांची भेट व महाआरती झाली. मागील वर्षीपासून नवगण राजुरी येथील शंकरानंद तीर्थ यांची दिंडीदेखील पालखी सोहळ्यात सामील होत आहे.
आदिशक्ती मुक्ताबाई यांची पालखी दोन दिवस बीड शहरात मुक्कामी होती. पहिल्या दिवशी माळीवेस येथील हनुमान मंदिरासमोर जिल्ह्यातील दुसरा रिंगण सोहळा पार पाडत भाविकांनी विश्राम घेतला, तर दुसऱ्या दिवशी माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, जुना बाजारमार्गे भाविकांना दर्शन देत बालाजी मंदिरात मुक्काम केला. दोन दिवस भाविकांच्या सहवासाने बीड शहर 'शक्तिमय' झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरातील भाविकांचा उत्साह दिसून आला. दरम्यान, बालाजी मंदिरातून पालखीने प्रस्थान केल्यानंतर बार्शी नाका येथे पहिला विश्राम घेतला. यावेळी भाविकांनी फळांसह विविध खाद्यपदार्थांचे वाटप केले. पाली येथे पालखीचा मुक्काम होता.
नात आजोबांची भेट काळजाला पीळ पाडणारी
आजोबा गोविंदपंत व आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पादुकांची स्पर्श भेट काळजाला पीळ पाडणारी होती. गोविंदपंत यांच्या पादुका आदिशक्तींना पंढरीकडे मार्गस्थ करण्यासाठी नगराबाहेर आणल्या गेल्या होत्या. वर्षभरानंतर आपल्या वृद्ध आजोबाला नात भेटायला येते हा क्षण आमच्यासाठी खूप भावनात्मक असल्याचे पालखी कार्यवाह राजेंद्र संबारे यांनी सांगितले.
१२० वी दिंडी शंकरानंद तीर्थांची
आदिशक्ती मुक्ताबाई यांची पालखी ११९ दिंड्यांना घेऊन बीडमध्ये आली होती. आता यापुढे दिंड्यांची संख्या वाढत चालली आहे. नवगण राजुरी येथील शंकरानंद तीर्थ यांची दिंडीदेखील या पालखी सोहळ्यात सामील झाली. आता १२०वी (दिंडी क्रमांक) दिंडी शंकरानंद तीर्थ यांची आहे. मागील वर्षापासून ही दिंडी पालखीत सामील होत आहे.