नैराश्य आलंय, जीवन नकोसे वाटते... थांबा, १४४१६ वर काॅल करा अन् टेन्शन फ्री व्हा!

By सोमनाथ खताळ | Published: December 20, 2023 07:53 PM2023-12-20T19:53:47+5:302023-12-20T19:54:01+5:30

समुपदेशन अन् उपचार : अंबाजोगाईचे टेली मानस केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर

Depressed, life feels unwanted... wait, call 14416 and be tension free! | नैराश्य आलंय, जीवन नकोसे वाटते... थांबा, १४४१६ वर काॅल करा अन् टेन्शन फ्री व्हा!

नैराश्य आलंय, जीवन नकोसे वाटते... थांबा, १४४१६ वर काॅल करा अन् टेन्शन फ्री व्हा!

बीड : तणावात आहात. कोणत्याही कारणाने नैराश्य आले असेल आणि डाेक्यात आत्महत्याचा विचार येत असेल तर थांबा. आपला मोबाइल घ्या अन् १४४१६ हा टोल फ्री क्रमांक डायल करा. तुमच्या सर्व अडचणींवर मार्ग काढण्यासह तुमचे समुपदेशन करून आत्महत्येपासून परावृत्त केले जाईल. एवढेच नव्हे तर मोफत उपचार व सल्लाही दिला जाईल. मागील वर्षभरात १७ हजार लोकांना सेवा देऊन अंबाजोगाईचे टेली मानस केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर आले आहे.

मराठवाड्यात अंबाजोगाई (लोखंडी सावरगाव), पुणे आणि ठाणे या ठिकाणी टेली मानस केंद्र सुरू केले आहे. येथे मानसोपचार तज्ज्ञांसह समुपदेशकांची नियुक्ती आहे. कोणत्याही व्यक्तिला मानसिक आजारासंदर्भात तक्रार असल्यास त्यांना मोफत सल्ला देण्यासाठी हे टेली मानस केंद्र आधार देते. मागील वर्षभरात राज्यातील ४५ हजार लोकांना या सेवेच्या माध्यमातून सल्ला व उपचार करण्यात आले आहेत. सध्या तरी याची जनजागृती फारशी जनजागृती नसली तरी आरोग्य विभागाकडून शिबीरे, कार्यक्रम घेऊन याची माहिती दिली जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज तोटेवाड, डॉ. शिवराज पेस्टे यांच्यासह २० समुपदेशक रुग्णांचा तणाव दूर करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

या आजारांचे निदान, उपचार व समुपदेशन
व्यसनमुक्ती, विसराळुपणा, वेडेपणा, चिंता, भीती, भूतबाधा, वर्तमानातील बदल, वारंवार विचार येणे, संशय येणे, घाबरणे, आत्महत्येचा विचार, उन्माद, लैंगिक समस्या, भास होणे, उदासीनपणा, डोकेदुखी, मतिमंदत्व, स्किझोफ्रेनिया, करणी, अंगात येणे, निद्रानाश, अतिनैराश्य, बालवयातील मानसिक समस्या यावर उपचार व सल्ला दिला जातो. हे सर्व मोफत आहे.

कधीही कॉल करा, २४ तास सेवा
१४४१६ हा टोल फ्री क्रमांक २४ तास चालू असतो. प्रत्येक सहा तासाला ५ समुपदेशक आणि एक मानसोपचार तज्ज्ञ येथे कर्तव्यावर असतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही वेळेत निसंकोचपणे कॉल करावा, असे अधीक्षक डॉ. चव्हाण यांनी सांगितले. तसेच सर्वात जास्त कॉल हे दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेतच येत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.

राज्यातील पहिले केंद्र
विमलताई मुंदडा या आरोग्यमंत्री असताना साधारण २००८ साली त्यांनी राज्यातील पहिले वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र अंबाजोगाईला मंजूर करून घेतले. यासाठी टप्याटप्याने जवळपास ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले. कोरोनाकाळात या ठिकाणी तब्बल १ हजार खाटांचे सर्वात मोठे कोरोना सेंटर तयार केले होते. आज या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा आहेत, परंतु केवळ शिपाई नसल्याने येथील अनेक कामे खोळंबल्याचे सूत्रांनी सांगितले. याठिकाणी शिपायांची भरती बाह्ययंत्रणेमार्फत करण्यात आली होती. परंतु ती वादात सापडल्याने नंतर रद्द केली. त्यामुळे शिपायांचा प्रश्न आजही कायम आहे.

कोठे किती उपचार?
अंबाजोगाई - १७,५८१
पुणे - १४,३७३
ठाणे - १४,१०६

Web Title: Depressed, life feels unwanted... wait, call 14416 and be tension free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.