जिपचा उपअभियंता आणि लेखापाल ६ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 06:23 PM2021-03-31T18:23:47+5:302021-03-31T18:25:03+5:30
Deputy engineer and accountant of ZP caught red handed by ACB Beed हिंगणी बुद्रुक या गावातील रस्त्याचे व नाली बांधकामाचे बिल देण्यासाठी घेतली लाच
माजलगाव : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या उपअभियंता हिरामण गालफाडे व लेखापाल रमेश मिठेवाड यास बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. माजलगाव येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, याच कार्यालयातील उपअभियंता बहीर यास ३ महिन्यांपूर्वी १० हजारांची लाच घेताना पकडले होते. त्या रिक्त जागेचा पदभार गालफाडे यांना देण्यात आला होता व तेही एसीबीच्या जाळ्यात अडकले.
माजलगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्यावतीने मतदार संघातील हिंगणी बुद्रुक या गावातील रस्त्याचे व नाली बांधकामाचे काम पूर्ण झाले होते. मात्र, याचे बिल देण्यासाठी संबंधित ठेकेदाराला उपअभियंता गालफाडे हे १२ हजार रुपये टक्केवारी मागत होते. परंतु, टक्केवारी देण्यास ठेकेदाराने असमर्थता दर्शवली. शेवटी ६ हजार रुपये देतो असे म्हणून तडजोड केली. त्यानंतर बीडलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ठेकेदाराने तक्रार दाखल केली. त्यानुसार बुधवारी दुपारी पंचायत समिती आवारात असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयात एसीबीने सापळा लावला. यावेळी लेखापाल मिठेवाड व गालफाडे यांना सहा हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सखाराम घोलप, अमोल बागलाने, विजय बरकसे यांनी केली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एसीबीचे पथक दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेत आहे.