धारूरमध्ये ऊसतोड महिला कामगारांचा तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:07 AM2019-09-04T00:07:43+5:302019-09-04T00:08:54+5:30
ऊसतोडणी कामगारांनी संघटीत होऊन संघर्ष केल्याशिवाय त्यांचे काहीच कल्याण होणार नाही. कामगारांनी ढोंगी नेतृत्व झुगारून लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली लढा उभारावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र उसतोडणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. दत्ता डाके यांनी केले.
धारूर : ऊसतोडणी कामगारांनी संघटीत होऊन संघर्ष केल्याशिवाय त्यांचे काहीच कल्याण होणार नाही. कामगारांनी ढोंगी नेतृत्व झुगारून लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली लढा उभारावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र उसतोडणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. दत्ता डाके यांनी केले. आपल्या विविध मागण्यांसाठी ऊसतोडणी महिलांनी काढलेल्या मोर्चासमोर ते मार्गदर्शन करीत होते. या वेळी कॉ सय्यद रज्जाक कॉ मनीषा करपे यांचे ही भाषण झाले.
गर्भाशयाचे आॅपरेशन करून पिशवी काढून टाकलेल्या ऊसतोडणी कामगार महिलांना नुकसान भरपाई द्यावी, अशा महिलांना अपंग प्रमाणपत्र देण्यात यावे, पिशवी काढलेल्या महिलांना काम होत नसल्याने त्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन द्यावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी धारूर तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या वेळी ऊसतोडणी महिला कामगारांची उपस्थित मोठ्या प्रमाणात होती. महिलांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
विविध मागण्या : मान्य होईपर्यंत आंदोलनाचा महिलांचा निर्धार
गर्भाशयाचे आॅपरेशन करून पिशवी काढून टाकलेल्या ऊसतोडणी कामगार महिलांना नुकसान भरपाई द्यावी, अशा महिलांना अपंग प्रमाणपत्र देण्यात यावे.
पिशवी काढलेल्या महिलांना काम होत नसल्याने त्यांना दरमहा तिन हजार रुपये पेन्शन द्यावी.
ऊसतोडणीचे दर चाळीस टक्यांनी वाढवणारा नवीन करार करावा, ऊसतोडणी कामगारांच्या कल्याणकारी मंडळासाठी शासनाने अर्थिक तरतूद करून सामाजिक सुरक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार यावेळी महिलांनी केला.