पोलिसाच्या मुलाची संगत असूनही ‘तो’ बालपणीच बनला सराईत गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:29 PM2018-03-20T23:29:37+5:302018-03-20T23:29:37+5:30
मित्र चांगला असावा, असे आई-वडील नेहमी सांगतात. परंतु लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. आई गृहिणी होती. अशातच पोलिसाच्या मुलासोबत ओळख झाली. ही ओळख चांगल्या हेतूने करून घेतली होती, परंतु नंतर याचे रुपांतर गुन्हेगारीत झाले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ‘तो’ चोरी करण्याकडे वळला. आज तो सराईत गुन्हेगार बनला असून पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. त्याला नुकतेच बीड पोलिसांनी ताब्यात घेतले असून परळी तीन व बीडमधील चार घरफोड्या केल्याची त्याने कबुली दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मित्र चांगला असावा, असे आई-वडील नेहमी सांगतात. परंतु लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. आई गृहिणी होती. अशातच पोलिसाच्या मुलासोबत ओळख झाली. ही ओळख चांगल्या हेतूने करून घेतली होती, परंतु नंतर याचे रुपांतर गुन्हेगारीत झाले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ‘तो’ चोरी करण्याकडे वळला. आज तो सराईत गुन्हेगार बनला असून पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. त्याला नुकतेच बीड पोलिसांनी ताब्यात घेतले असून परळी तीन व बीडमधील चार घरफोड्या केल्याची त्याने कबुली दिली आहे.
आरोपी शकील (नाव बदललेले) याचे वय सध्या १७ वर्षे असून तो मूळचा परभणीचा रहिवासी. हॉटेल किंवा इतर ठिकाणी काम करून तो पोट भरायचा. तेव्हा त्याचे वय अवघे दहा वर्षे होते. परभणीत मोठा ऊरूस भरतो. या ऊरूसमध्ये शकीलही जात असे. येथेच त्याची जालना येथील पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा सिद्धार्थ जाधव याच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. शकीलला सिद्धार्थचा इतिहास माहिती नव्हता.
त्याने शकीलला सुरूवातीला बाजारात सुरट नावाचा जुगार खेळण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याला काम लावतो म्हणून सिद्धार्थ शकीलला घेऊन जालन्याला गेला. येथेच त्याला चोरी करण्यास शिकविले. परभणी, जालना, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत या दोघांनी धुमाकूळ घातला होता.
दोन महिन्यांपासून सिद्धार्थ व शकीलने बीड जिल्ह्यात पाय पसरायला सुरूवात केली होती. त्यांनी परळी शहर पोलीस ठाणे हद्दीत दोन, संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एक व बीड शहरात चार घरफोड्या केल्या. भरदिवसा घरफोड्या झाल्याने बीड जिल्हा पोलीस दल खडबडून जागे झाले होते तर दुसºया बाजूला नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. अखेर बीड पोलिसांना शकीलला पकडण्यात यश आले. तर सिद्धार्थला परभणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला बीडमधील गुन्ह्यांमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मौज, मस्तीसाठी चो-या
शकिलला घरफोड्या केल्याने चांगले पैसे मिळायला लागले होते. नवीन कपडे, महागडा मोबाईल व मोठ्या हॉटेलमध्ये मनपसंत जेवण मिळत होते. मौज, मस्तीची त्याला सवय झाली होती. पैसे संपताच तो पुन्हा घरफोडी करायचा. मस्तीसाठीच तो गुन्हेगार बनल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
५ मिनिटांत घर साफ
घरफोडी करताना सिद्धार्थ आणि शकील दोघेही वेगवेगळ्या गल्लीत जात असत. एखादे कुलूपबंद घर दिसले की जवळ कोणी आहे का? याची दोघेही खात्री करीत होते. त्यानंतर शकील हा कुलूप उघडण्यात तरबेज होता. शकीलने कुलूप उघडताच दोघेही घरात जायचे आणि ५ मिनिटांत घर साफ करून पसार व्हायचे.
१८ तोळे सोने जप्त
शकीलकडून बीड पोलिसांनी १८ तोळे सोने जप्त केले आहे.
काही सोने त्याने जालना येथील एका सराफा व्यापा-याला विक्री केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
सिद्धार्थचे वडील आहेत पोलीस जमादार
रात्रंदिवस जनतेची सेवा करणा-या पोलीस जमादाराचाच मुलगा अट्टल गुन्हेगार असेल, यावर कोणाला विश्वास बसणार नाही. परंतु सिद्धार्थबाबत हे घडले आहे. सिद्धार्थचे वडील जालना जिल्ह्यातीलच एका पोलीस ठाण्यात जमादार म्हणून कर्तव्य बजावत आहेत. अनेक वेळा सिद्धार्थला पकडण्यासाठी तेही धावल्याचे सूत्रांकडून समजते.