अमानवी अत्याचार होत असतानाही वि. दा. सावरकर स्वातंत्र्याच्या ध्येयापासून कणभरही विचलित झाले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:02 AM2021-03-04T05:02:22+5:302021-03-04T05:02:22+5:30
लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर : वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयात व्याख्यान बीड : थोर स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रभक्त वि. दा. सावरकर यांच्यावर परकीय राजवटीद्वारे ...
लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर : वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयात व्याख्यान
बीड : थोर स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रभक्त वि. दा. सावरकर यांच्यावर परकीय राजवटीद्वारे अमानवी अत्याचार केला गेला. त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली गेली तरी स्वातंत्र्याच्या ध्येयापासून कणभरही ते विचलित झाले नाहीत. अंदमान तेथे त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा भोगत असतानाही त्यांचा स्वातंत्र्याचा लढा चालू होता. अंदमान येथील कारागृहाच्या अमानवी वागणुकीविरोधात संप करून इंग्रजांना कारागृहाच्या नियमात बदल करण्यास भाग पाडले. राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रीय उन्नतीसाठी वि. दा. सावरकर यांचे विचार आजही प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहेत, असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी व्यक्त केले.
बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय आणि अटल जनसेवक मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंदमानातील सावरकर’ या विषयावर उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश भाऊ पोकळे तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. नामदेव सानप, भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाहक चंद्रकांत मुळे, प्रा. बन्सी हवाळे, डॉ. राजेश भुसारी, संस्था सचिव गणेश पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर म्हणाले की, वि. दा. सावरकर हे जहाल मतवादी होते. सशस्त्र क्रांतीवर त्यांचा विश्वास होता. सावरकर भाषा साहित्याचे गाढे अभ्यासक होते. अंदमानातील कारागृहात कैद्यांना एकत्र करून साक्षरता मोहीम त्यांनी राबविली. भाषेचा प्रचार व प्रसार केला. कारागृहात ग्रंथालय सुरू करण्यास भाग पाडले. जाती व धर्मभेदाला विरोध केला. सावरकरांनी मानवी एकतेचा संदेश दिला. सावरकर यांचे विचार, लेखन आजही प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहे, असे डॉ. बाहेगव्हाणकर यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना संस्था अध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले की, वि. दा. सावरकर हे आक्रमक देशभक्त होते. सशस्त्र क्रांतीमुळे परकीय राजवटीला खऱ्या अर्थाने सुरुंग लावण्याचे काम त्यांनी केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी संतोष सावंत, प्रवीण पवार, सत्यशील मिसाळ, अशोक रसाळ, राहुल मुळे, विशाल जोशी, प्रा. वैजनाथ शिंदे, प्रा. सुरेश कसबे, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. बप्पासाहेब हावळे यांनी केले तर प्रा. विजय दहिवाळ यांनी आभार मानले.
===Photopath===
010321\070701bed_29_01032021_14.jpg
===Caption===
बीड येथे ‘अंदमानातील सावरकर’ या विषयावर उपप्राचार्य डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रमेश भाऊ पोकळे होते.