कृषी विभाग, ओरिएन्टलकडे तक्रार देऊनही मिळेना विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:44 PM2019-09-01T23:44:27+5:302019-09-01T23:45:40+5:30
बीड : क्षेत्राएवढाच विमा भरल्यानंतरही ‘ओव्हर इन्शुरन्स’चे कारण सांगून जिल्ह्यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सोयाबीन विमा नाकारला होता. याबाबत ...
बीड : क्षेत्राएवढाच विमा भरल्यानंतरही ‘ओव्हर इन्शुरन्स’चे कारण सांगून जिल्ह्यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सोयाबीन विमा नाकारला होता. याबाबत कृषी विभाग व ओरिएन्टल इन्शुरन्स कपंनीकडे तक्रार करूनही यावर प्रतिसाद मिळालेला नाही. अनेक शेतक-यांनी पुण्याच्या कार्यालयातही भेट दिली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र संताप आहे.
२०१९-१९ मध्ये बीड जिल्ह्यात १४ लाख ११ हजार ६१३ शेतक-यांनी खरीपातील विमा भरला होता. यामध्ये ४ लाख ७६ हजार ५८७ शेतक-यांनी सोयाबीन विमा भरला होता. मात्र, यातील ५० हजारपेक्षा जास्त शेतकºयांना ‘ओव्हर इन्शुरन्स’चे कारण सांगून सोयाबीन विमा नाकारला होता. विशेष म्हणजे क्षेत्राएवढाच विमा भरल्यानंतरही ‘ओव्हर इन्शुरन्स’ कसे क्षेत्र आले? याबाबत शेतकरी चक्रावले होते. त्यानंतर कृषी विभागाच्या म्हणण्यानूसार शेतकºयांनी बीडच्या कंपनीकडे आणि प्रत्येक तालुक्याला कृषी कार्यालयात सर्व पुराव्यानिशी तक्रारी केल्या. मात्र, यातील बहुतांश शेतकºयांना तक्रारी करूनही अद्याप विमा मिळालेला नाही. याबाबत आपल्याकडे सर्व पुरावे असून आणि कंपनी व कृषी विभागाकडे मागणी करूनही आपल्याला उत्तरे दिली जात नाहीत. आम्हाला विम्यापासून वंचित ठेवल्याची प्रतिक्रिया अंबाजोगाई तालुक्यातील मंगेश शिंदे नामक शेतक-याने दिली. आपण पाच ते सहा वेळा बीडच्या कृषी आणि संबंधित कंपनीच्या कार्यालयात खेटे मारल्याचेही त्यांनी सांगितले.
पीक विमाप्रश्नी सुनावणीत ५० टक्के प्रकरणांचा निपटारा
बीड : खरीप हंगाम तसेच फळबाग पिकविमा संदर्भात तक्रारी असलेल्या शेतकºयांची सुनावणी शनिवारी रात्री उशीरापर्यंत तहसील कार्यालयात सुरु होती. यामध्ये जवळपास १७५ तक्रारदार शेतक-यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ५० टक्के शेतकºयांच्या तक्रारींचा निपटारा झाला आहे.
यावेळी बीडचे तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, तहसीलदार अविनाश शिंगटे, शेतकरी प्रतिनिधी दत्ता जाधव, शिवराम घोडके यांच्यासह सीएससी सेंटर चे प्रतिनिधी व ओरिएंटल इन्शूरन्स कंपनी, बजाज, आॅल इंडिया इन्श्युरन्स यांचे प्रतिनिधी तसेच तक्रारदार शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक शेतक-यांची तक्रार समजुन संबंधितांची मते घेऊन तात्काळ निपटारा करण्यात आला. सर्व्हे नंबरच्या ऐवजी बॅँक खाते नंबर असणे, बँकेचे खाते क्रमांक चुकणे, तसेच आधार लिंक नसणे यासारख्या तक्रारी शेतक-यांच्या होत्या. यासंदर्भात कंपनीकडे असलेली माहिती तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी पडताळून पाहिली व तक्रारीवर तोडगा काढला. तसेच १७५ शेतक-यांपैकी जवळपास ९० ते ९५ शेतकºयांचा प्रश्न सुटला असून त्यांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुसºया टप्प्यातील सुनावणी देखील या आठवड्यात घेण्यात येणार असून यामध्ये उर्वरीत शेतक-यांची तक्रार निवारण केली जाईल अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.