‘नियती कोणाला माफ करत नसते’; जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 11:44 AM2019-10-02T11:44:37+5:302019-10-02T11:57:43+5:30
किल्ले, बुरूज ढासळत आहेत
बीड : शिवसेनेत आल्यापासून मनस्वी आनंद होत आहे, आपले सर्व कार्यक्रम हाऊसफुल होत आहेत, तिकडे उलटे चित्र पाहण्यास मिळत आहे, सगळी गळती लागली आहे, किल्ले कोसळत आहेत, बुरूज ढासळत आहेत, शिल्लक कोणी राहिले का, हे तपासले जात आहे. महायुती होऊ नये म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवले होते, अशा शब्दात जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
महायुतीचा निर्णय झाला. आता महायुतीचेच सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. ठाकरे कुटुंबात इतिहास घडत आहेत, आदित्य ठाकरे निवडणुकीत उतरल्याने मोठा उत्साह संचारला आहे, मंत्रालयाचा सहावा मजला त्यांची वाट पाहत आहे, असेही यावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले. बीड मतदार संघातून महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर गुरूवारी सकाळी अकरा वाजता भव्य शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या अनुषंगाने आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला सभेचे स्वरूप प्राप्त झाले.
आता आपण सगळे एक झालो आहोत, विकास हेच आपले नाते, विकास हाच आपला जवळीकतेचा धागा आहे, आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचे आहे. हा महाराष्ट्र आणि तहानलेला मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा आहे. शिवसेनेने मला प्रवेश दिला, मंत्रीपद दिले, आता उमेदवारीही दिली. कमी षटकात जास्त धावा करण्याचे काम आपल्याकडे दोन महिन्यात झाले. नियती कोणाला माफ करत नसते, पेपर आला सिंचनाचा अन् उत्तर द्यावे लागले बँकेचे, उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो, अनैतिकतेने वागलात त्याची परतफेड करावीच लागेल, अजूनही राष्ट्रवादीची गळती थांबायला तयार नाही, शिल्लक कोणी राहते का हे बघण्याची वेळ आली आहे, आपली इच्छा नाही कोणाचे वाईट व्हावे, सगळे गुण्या-गोविंदाने राहावे, कोणी कोणाच्या ताटात मिठाचा खडा टाकू नये हीच आपली भावना असते, जाऊ द्या. आपण आपला धनुष्यबाण हाती घेतला आहे, जनसेवा आणि समाजसेवा करत शिवसेनाप्रमुख यांची शिकवण पूर्ण करायची आहे असे ते म्हणाले.
जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी वज्रमूठ आवळून प्रचाराला लागण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. शिवसैनिकांचे परिश्रम, त्याग मतदारसंघ बांधून ठेवण्याच्या कामाला आले. राष्ट्रवादीची अधोगती सुरू झाली आहे. शिवसैनिकांनी कामाला लागायचे आहे. तरुणांची फौज शिवसेनेच्या पाठीमागे खंबीर उभी आहे. मोठ्या मानाने भगवा फडकावयाचा आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणायचे आहे. विकासाची गंगा आणण्याचे काम त्यांनी केले आहे. चिंता करू नका, शिवसैनिक गाफील बसणार नाही. मतदारांनो, तुम्हीही भूलथापांना बळी पडू नका , असे आवाहन बाळासाहेब पिंगळे यांनी आपल्या भाषणात केले.
यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर, विलास महाराज शिंदे, सागर बहीर, वैजीनाथ तांदळे, बाळासाहेब आंबुरे, जयसिंग चुंगडे, नितीन धांडे, अरुण बोंगाणे, दिलीप भोसले, महिला जिल्हा संघटक संगीताताई चव्हाण, चंद्रकला बांगर, सारिका काळे, उर्मिला थोरात, अलकाताई डावकर, विलास बडगे, दिलीप गोरे, संजय महाद्वार, अरूण डाके, गणपत डोईफोडे, दिनकर कदम, शिवाजी जाधव, झुंजार धांडे, रतन गुजर, गोरख सिंगण, शेख खालेद, रत्नाकर शिंदे, किसन कदम, राजू काळे, आशिष काळे, शुभम कातांगळे, सखाराम मस्के, सुनील सुरवसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.किशोर काळे यांनी केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक अशोक शिराळे, बंडे शिंदे, किरण बेद्रे यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रवेशानंतर जयदत्त क्षीरसागर, कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे यांनी पक्षात प्रवेश केल्याबद्दल स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आता रडत आहेत
राष्ट्रवादीचे श्रेष्ठी क्षीरसागरांना छोटे समजत होते. हीनतेने वागवत होते. खूप त्रास दिला. बीडकरांच्या नादी कशाला लागताय? जैसी करनी वैसी भरनी. आता रडायला लागले आहेत. उमेदवाऱ्या जाहीर करूनही कोणी राष्ट्रवादीत थांबायला तयार नाहीत. किती लाजिरवाणी बाब आहे. कशाचे हो हे राष्ट्रीय नेते? राष्ट्रवादीचं आता अस्तित्वच संपलंय, असा घणाघाती आरोप करत गुरूवारी शिवसैनिकांचा उत्साह बीडच्या रस्त्या रस्त्यावर दिसेल असा विश्वास नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
अर्ज भरण्याची नव्हे तर विजयी मिरवणूक असेल
जयदत्त क्षीरसागरांनी आता हाती धनुष्यबाण घेतले आहे. गळ्यात भगवा आणि हातात विजयी ध्वज घेऊन गुरुवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसैनिकांनी ताकदीने यायचं. परिवर्तन घडवून आणायचं आहे. भागा -भागात, वाडी-वस्तीत, गावा-गावात काम करायचं आहे, हेवे- दावे विसरायचे आहेत. उज्वल भविष्य आपली वाट पाहतंय, जयदत्त क्षीरसागरांच्या मताधिक्याचा दरारा निर्माण झाला पाहिजे.ही भगवी ताकद गुरूवारी दाखवून द्यायची आहे, ती ताकद अर्ज भरण्याची नव्हे तर विजयी मिरवणुकीची असेल, असा आशावाद शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी परिसरातील शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली.