बीडच्या विकासासाठी खंबीर साथ देणार : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:20 AM2019-02-07T00:20:46+5:302019-02-07T00:21:46+5:30
स्व. काकू, स्व. मुंडे यांनी आपल्या नेतृत्व आणि कर्तृत्वाने अखिल भारतीय ओळख निर्माण केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव नगर पालिकेच्या सभागृहाला देऊन संघर्षशील नेत्याचा सन्मान केला आहे. बीड शहराच्या विकासासाठी खंबीरपणे साथ देणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला मंजुरी देत राजकारण विरहीत विकास पर्वाला प्रारंभ केला.
बीड : स्व. काकू, स्व. मुंडे यांनी आपल्या नेतृत्व आणि कर्तृत्वाने अखिल भारतीय ओळख निर्माण केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव नगर पालिकेच्या सभागृहाला देऊन संघर्षशील नेत्याचा सन्मान केला आहे. बीड शहराच्या विकासासाठी खंबीरपणे साथ देणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला मंजुरी देत राजकारण विरहीत विकास पर्वाला प्रारंभ केला.
बीड नगर पालिकेच्या अमृत भूयारी गटार योजना, मराठवाड्यातील पहिल्या निवारा गृहाचे लोकार्पण, नगरोत्थान अंतर्गत १६ डि.पी.रस्ता कामाचे भूमिपूजन, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४४८ घराच्या निर्मितीचा शुभारंभ, न.प.सभागृहाचा लोकनेते स्व.गोपीनाथराव मुुंडे नामकरण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा मुंडे, आ.जयदत्त क्षीरसागर, आ.सुरेश धस, आ. सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ. भीमराव धोंडे, आ.आर.टी. देशमुख, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे नरेंद्र पाटील, पद्मश्री डॉ.वामन केंद्रे, पद्मश्री सय्यद शब्बीर, सुवर्णपदक विजेते राहूल आवारे, १४ वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार सचिन धस, माजी आ.बदामराव पंडित, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, सीईओ अमोल येडगे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, रोहीत क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, प्रा. जगदीश काळे, माजी आ.साहेबराव दरेकर आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या कामात पक्ष न पाहता एक मुख्यमंत्री म्हणून सबका साथ सबका विकास हे कृतीतून दाखवून दिले आहे. आम्ही आमच्या कृतीतून काम दाखवितो म्हणूनच मतदार आमच्या पाठीशी उभे राहतात, असे सांगून त्यांनी बीडमध्ये तारांगण, महिलांसाठी स्वतंत्र निवारागृह आदी विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
जो काम करतो त्याच्या पाठीशी बीड जिल्हा खंबीरपणे उभा राहतो
यावेळी आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले, कुठलाही राजकीय अभिनिवेश न पाहता मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी सकारात्मकता दाखविली. गट, तट, पक्ष न पाहता अनुशेष भरुन काढण्यासाठी दूरदृष्टीने पाहिले. पालकमंत्र्यांनी साथ दिली. जो काम करतो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आमचा बीड जिल्हा उभा राहतो हा आजपर्यतचा इतिहास आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत ११ लाख पशुधनासाठी छावणी सुरू करून जनावरांना जगविणे महत्वाचे आहे. हाताला काम आणि आणि धान्य मिळावे. माणसी १० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू दुष्काळ संपेपर्यत वाटप करावा तसेच शासनाच्या वतीने अल्प भूधारक शेतकºयांना वर्षाला सहा हजार रूपये जाहीर केले आहेत त्यात वाढ करावी. रेशीम उद्योगाच्या दृष्टीने उपाय योजना करावी, जिल्ह्यातील अनेकांनी खाजगी संस्थामध्ये जवळपास ५० कोटींची गुंतवणूक केली आहे त्या कंपन्यांनी हा पैसा घेवून पोबारा केला आहे. या गुंतवणूक दारांचे पैसे मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी, जायकवाडीतून ३ टीएमसी पाणी माजलगाव धरणात सोडावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
राष्ट्रवादी कानफुक्यांचा पक्ष...
अण्णा, माझा जुना, तुमचा आताचा पक्ष कानफुक्यांचा पक्ष घरफोडे सहकारी संस्था होऊन बसला आहे, अशा शब्दात राष्टÑवादीच्या नेत्यांना टोले लगावत सुरेश धसांनी फटकेबाजी केली.
बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. व्यासपीठावरील मैदान आ. धस यांनी मारले. राजकारण म्हणजे आमची मक्तेदारी असे समजणाºयांना मुख्यमंत्री फडणवीस पुरून उरल्याचे धस म्हणाले. प्रामाणिक, निष्कलंक मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेख केला.
मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्याबद्दल धस म्हणाले, तुमच्या काळापूर्वी आमच्या नशिबी नव्हते. दोन कोटी दिले असे बजवायचे, आम्हीही तेवढ्यात ‘गुडगुड’ होऊन खूश व्हायचो. या सरकारच्या काळात लहान शेतकºयाला कर्जमाफी झाल्याचे धस म्हणाले. सबसिडी व अनुदानामुळे दुधाला भाव मिळाला. कृषी योजनांमधील दलालांची दुकाने आॅनलाईनमुळे बंद झाली.
जिल्ह्यातील काही नेते मोठे झालेत ते खाली बोलतच नाही, असा टोला धनंजय मुंडे यांना लगावत गोपीनाथ मुंडेंच्या आदर्शावर ३०० मते इतकंच त्यांचं राजकीय क्वालिफिकेशन आहे. गल्लीत गोंधळ करणारे मात्र दिल्लीत मुजरा करतात, अशी टीका धस यांनी केली.
मंडळाऐवजी एका गावात एक -दोन छावण्या लवकरात लवकर द्या, थांबू नका अशी मागणी धस यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.