विकासाचा मुद्दा ठरला विजयासाठी महत्त्वाचा - प्रीतम मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:33 AM2019-05-24T01:33:12+5:302019-05-24T01:34:07+5:30
जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतपर्यंत वेगवेगळ्या योजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी विकासासाठी दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयी उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रभात बुडूख। लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी आणि पंकजातार्इंनी केलेले प्रयत्न, आणलेला निधी लोकांना भावला. आम्ही केलेली विकास कामे लोकांच्या नजरेसमोर होती. जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतपर्यंत वेगवेगळ्या योजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी विकासासाठी दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयी उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
विजयाचे श्रेय आपण कोणाला देता ?
उत्तर : माझ्या विजयाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पासून ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे, जिल्ह्याची नेतेमंडळी, सर्वसामान्य कार्यकर्ते, मतदारांना आहे. या सर्वांनी माझ्या उमेदवारीवर विश्वास टाकला. आम्ही केलेल्या विकास कामाची पावती भरभरुन मतदान करुन दिली.
निवडणूक प्रचाराचा दर्जा कसा होता ?
उत्तर : बाबा आणि पंकजातार्इंच्या अनेक निवडणुका जवळून पाहिल्या. परंतु या निवडणुकीसारखा जातीयवाद यापूर्वी कधी अनुभवला नाही. अतिशय खालच्या पातळीवर जावून काही मंडळींनी जातीय राजकारण केले. परंतु मतदारांनी मात्र, त्यांचे हे मनसुबे उधळून लावत जातीवादाला दूर सारत विकासाला मत दिले.
भविष्यात कशास प्राधान्य द्याल ?
उत्तर : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे आणि रेल्वेमार्गाचे काम १०० टक्के लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे. तसेच शालेय सुविधा वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे.