बीडमध्ये विकासाचे मुद्दे माघारले; जातीपातीची लागली कसोटी; तिरंगी लढत : पंकजा मुंडेंना बजरंग सोनवणेंचे खरे आव्हान

By सोमनाथ खताळ | Published: May 7, 2024 08:56 AM2024-05-07T08:56:39+5:302024-05-07T08:57:01+5:30

जातीच्या राजकारणाचा कोणाला् तोटा होऊन कोणाला फायदा होणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.

Development issues retreated in Beed; Casteism was tested; Triple fight: Bajrang Sonavan's real challenge to Pankaja Munde | बीडमध्ये विकासाचे मुद्दे माघारले; जातीपातीची लागली कसोटी; तिरंगी लढत : पंकजा मुंडेंना बजरंग सोनवणेंचे खरे आव्हान

बीडमध्ये विकासाचे मुद्दे माघारले; जातीपातीची लागली कसोटी; तिरंगी लढत : पंकजा मुंडेंना बजरंग सोनवणेंचे खरे आव्हान

- सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लोकसभा निवडणुकीतील प्रचारात सध्या तरी जातीचे राजकारण सुरू आहे. विकासाच्या मुद्यावर बोलण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप करण्यातच उमेदवार धन्यता मानत आहेत. यावेळी तिरंगी लढत होत आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासमोर खरे आव्हान हे मविआचे अर्थात शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचेच आहे. परंतु, जातीच्या राजकारणाचा कोणाला् तोटा होऊन कोणाला फायदा होणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.

येथून भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे सलग दोन वेळा खासदार झाल्या. त्या हॅटट्रिक साधणार, असे वाटत असतानाच पक्षाने त्यांचे तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात बजरंग सोनवणे आणि वंचितचे अशोक हिंगे हे निवडणूक रिंगणात आहेत. २०१९ रोजी पराभूत झालेले बजरंग सोनवणे यांना सलग दुसऱ्यांदा मविआने उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे ओबीसी, सोनवणे मराठा आणि हिंगे कुणबी मराठा म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळेच सध्या विकासापेक्षा जातीपातीचेच राजकारण अधिक सुरू आहे. 

मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच एकत्र
गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका-पुतण्यातील राजकीय वैर सर्व राज्याला माहिती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमधील भाजपचे नेतृत्व त्यांची मोठी मुलगी पंकजा मुंडे यांनी केले. २०१९ च्या विधानसभेत त्यांच्याविराेधात भाऊ धनंजय मुंडे होते. त्यांनी पंकजा यांचा पराभवही केला. परंतु राज्यातील राजकीय घडामोडींमुळे भाजप- अजित पवार गटात युती झाली. त्यामुळेच पंकजा आणि धनंजय हे दोघे बहीण-भाऊ एकत्र आले. पहिल्यांदाच लोकसभेत मुंडे बहीण-भाऊ एकत्र प्रचार करत आहेत. याचा पंकजा यांना लाभ होऊ शकतो. मागील २०१९ च्या लोकसभेत धनंजय यांनी बहीण डॉ. प्रीतम यांच्याविरोधात प्रचार केला होता. परंतु तरीही राष्ट्रवादीचे उमेदवार सोनवणे यांचा पराभव झाला होता.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी २०२४ ला अर्ज भरायला येताना रेल्वेतूनच येणार, असे ठणकाहून सांगितले होते. परंतु अद्यापही रेल्वे बीडपर्यंत आली नाही. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले जात आहे. ओबीसी, मराठा आरक्षणावरूनही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मराठा आरक्षणासाठी महायुतीच्या उमेदवारासह नेत्यांची गावागावात होणारी अडवणूक

स्थानिकला गटतट, पण प्रचारात एकत्र
जिल्ह्यात महायुतीकडे एका खासदारासह सहा आमदार आहेत. तर मविआकडे एक खासदार आणि एक आमदार आहे. संख्याबळाच्या तुलनेत महायुती मजबूत आहे. युतीचे सर्व नेते पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी धावपळ करत आहेत. असे असले तरी स्थानिक पातळीवरील गटतट प्रकर्षाने जाणवत आहेत. याचा फटका फारसा जाणवणार नाही.


२०१९ मध्ये काय घडले?
डॉ. प्रीतम मुंडे    भाजप (विजयी)    ६,७८,१७५
बजरंग सोनवणे    राष्ट्रवादी    ५,०९,८०७
प्रा. विष्णू जाधव    वंचित बहुजन आघाडी    ९२,१३९
नोटा    -    २५००

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष    विजयी उमेदवार      पक्ष         मते         टक्के
२०१४    प्रीतम मुंडे (पो.नि.)    भाजप     ९,२२,४१६    ७१%
२०१४    गोपीनाथ मुंडे    भाजप    ६,३५,९९५    ५१%
२००९    गोपीनाथ मुंडे    भाजप    ५,५३,९९४    ५१%
२००४    जयसिंग गायकवाड    रा.काँ.     ४,२५,०५१    ३२%
१९९९    जयसिंग गायकवाड    भाजप    ३,३२,९४६    ४१%

Web Title: Development issues retreated in Beed; Casteism was tested; Triple fight: Bajrang Sonavan's real challenge to Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.