सत्ताधाऱ्यांना व्हिजन नसल्यानेच मराठवाड्याचा विकास खुंटला - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:23+5:302021-09-06T04:37:23+5:30
बीड : सत्ताधारी हे नियोजन शून्य असून, त्यांना व्हिजन नसल्याने मराठवाड्याचा विकास खुंटल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ...
बीड : सत्ताधारी हे नियोजन शून्य असून, त्यांना व्हिजन नसल्याने मराठवाड्याचा विकास खुंटल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर उतरणार असून, मराठवाड्याचा सर्वांगीण विकास अणि नागरी सुविधा या प्रमुख विषयांवर आपले लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनात्मक समीक्षा आणि संवाद यात्रेदरम्यान शनिवारी त्या बीड येथे आल्या होत्या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकूर म्हणाल्या, घराणेशाहीचे चाललेले राजकारण, एमआयडीसीच्या जमिनीवर उद्योग नसल्याने रोजगाराची वाढती समस्या तसेच पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाबाबत कसलेही नियोजन नसल्याने नागरी सुविधांचा अभाव या प्रमुख विषयांवर वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार असल्याचे त्या म्हणाल्या. सत्ताधारी हे नियोजन शून्य असून, त्यांना व्हिजन नसल्याने मराठवाड्याचा विकास खुंटल्याचा आरोपही ठाकूर यांनी यावेळी केला. गेल्या २३ वर्षांत ओबीसींसाठी केवळ ५० कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याचे सांगून ओबीसी महामंडळाला भरीव निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली. ३० व ३१ ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणीही ठाकूर यांनी केली. मुस्लिम आरक्षणाबाबत अंमलबजावणी करावी म्हणून वंचित बहुजन आघाडी आग्रही असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रवक्ते फारूक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे, महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती शिरसाठ, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, विष्णू देवकते, बबन वडमारे आदी उपस्थित होते.
-----
जनगणना वैधानिक बंधन
केंद्र शासनाने ओबीसी जनगणना करावी तसे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. मात्र आता त्याचे पालन होत नसून कायदेशीरपणे इंम्पिरियल डाटा जनगणनेतूनच उपलब्ध होऊ शकेल. जनगणना हे वैधानिक बंधन आहे. ओबीसीचे भले होण्यासाठी त्यांची जनगणना आवश्यक असल्याचे मत ठाकूर यांनी व्यक्त केले. काही पक्ष, नेते ओबीसींच्या हिताचा विचार न करता फसवणूक करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
------