पांचाळेश्वर आत्मतीर्थचा विकास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:10+5:302021-09-26T04:36:10+5:30
सखाराम शिंदे गेवराई : तालुक्यात अनेक महत्त्वाची धार्मिक तीर्थक्षेत्रे असून, यापैकी एक म्हणजे श्री दत्त प्रभूंचे भोजनस्थान म्हणून असलेले ...
सखाराम शिंदे
गेवराई : तालुक्यात अनेक महत्त्वाची धार्मिक तीर्थक्षेत्रे असून, यापैकी एक म्हणजे श्री दत्त प्रभूंचे भोजनस्थान म्हणून असलेले तीर्थक्षेत्र पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र तसेच भारतातील हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. मात्र, या ठिकाणी मंदिर व परिसराचा विकास झाला नाही. नदीपात्रात घाट, राहण्यासाठी भक्त निवास, परिसरात सुशोभीकरण व सुविधा नसल्याने भाविकांची संख्या रोडावली आहे.
गेवराई शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीकाठावर श्री दत्त प्रभूंचे भारतातील एक प्रमुख भोजनस्थान म्हणून पांचाळेश्वर येथील आत्मतीर्थ देवस्थानाची ओळख आहे. श्री दत्त हे दररोज भ्रमंती करत. त्यांचे दुपारचे भोजन स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले हे पांचाळेश्वर, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाबसह भारतातील विविध ठिकाणांहून असंख्य भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात. गोदावरी नदीत हे मंदिर आहे. येथे दररोज दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात येते. या आरतीला भाविक भक्त आपापल्या पद्धतीने भोजन घेऊन श्री दत्त यांना प्रसाद म्हणून ठेवतात. श्रीकृष्ण जन्मआष्टमी, दत्त जयंतीनिमित्त येथे मोठी यात्रा भरते. मात्र, महत्त्वाचे व मोठे तीर्थक्षेत्र असूनही आजपर्यंत परिपूर्ण विकास झालेला नाही. याठिकाणी भाविकांना राहण्यासाठी कसलीच सोय नाही. मंदिराचा विकास झालेला नाही. परिसराचे सुशोभीकरण नाही, भाविकांना स्नान करण्यासाठी घाटदेखील नाही. यासह असंख्य असुविधांचा सामना भाविकांना करावा लागत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या परिसराचा विकास करावा, अशी अपेक्षा भाविक व्यक्त करतात.
////( चौकट ) ///
पांचाळेश्वर तीर्थस्थळी भारतातून असंख्य भाविक भक्त श्री दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिर व परिसराचा विकास झाला नसल्याने भाविक भक्तांना मोठी अडचण निर्माण होत आहे. या ठिकाणचा विकास झाल्यास भाविकांना सुविधा उपलब्ध होतील, असे महंत विजयराज गुर्जर बाबा म्हणाले.
श्री दत्त प्रभूंचे दैनंदिन नित्यक्रम
श्री दत्त प्रभू यांचे दररोजचे नित्यक्रम यात काशी स्नान, कोल्हापूर भिक्षा, पांचाळेश्वर भोजन, तसेच माहूर निद्रा, असे दत्त प्रभूंचे दैनंदिन नित्यक्रम सुरू आहेत. यावेळी भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सुविधा उपलब्ध झाल्यास या परिसरात रोजगार व पर्यटनालाही वाव मिळू शकतो.
250921\sakharam shinde_img-20210924-wa0056_14.jpg~250921\25bed_15_25092021_14.jpg