१३४ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:31 AM2021-02-07T04:31:20+5:302021-02-07T04:31:20+5:30
परळी : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या परिसराचा १३३.५८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाल्याचे राज्याचे सामाजिक न्याय ...
परळी : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या परिसराचा १३३.५८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधुन वैद्यनाथ मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे.
या योजनेतील प्रस्तावित कामांचे सादरीकरण धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ७ फेब्रुवारी रोजी दर्शन मंडप येथे होणार आहे.
परळी शहराची ओळख असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या परिसराचा धार्मिक कार्याबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुंडे यांच्या प्रयत्नाने हा विकास आराखडा मंजुर झाला असुन या योजनेतून वैद्यनाथ मंदिराच्या परिसरातील सर्वतीर्थ, सुसज्य भक्त निवास, वैद्यनाथ देवल कमिटीच्या अधिपत्याखालील मंदिरांचा तसेच डोंगर तुकाई, कालरात्री देवी मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे.
तीर्थक्षेत्र विकास योजनेतील ही कामे टप्याटप्याने करण्यात येणार आहेत.
या योजनेमुळे वैद्यनाथ मंदिर परिसराबरोबरच परळी शहराचा विकसित चेहरा समोर येणार आहे.
योजनेतील कामे कशी केली जाणार कुठल्या परिसराचा विकास कसा होणार याची चित्रफीत तयार करण्यात आली असून या चित्रफीतीचे सादरीकरण ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता दर्शन मंडप, वैद्यनाथ मंदिर, परळी वैजनाथ येथे परळी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी, धार्मिक व सामाजिक कार्यकर्ते आणि भाविक, भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे. या चित्रफीत सादरीकरणास वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सुरेश शेजुळ, नगराध्यक्षा सरोजनी हालगे, मंदिर देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, न.प.गटनेते वाल्मिक कराड, न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंढे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त प्रा.बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, संतूक देशमुख, अनिल तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे आदिंची उपस्थिती राहणार आहे. आपण या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन वैद्यनाथ देवल कमिटी व नगरपरिषद, परळी वैजनाथच्या वतीने करण्यात आले आहे.