देविनिमगावात ३४ कोरोनाबाधित फिरले बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:35 AM2021-05-27T04:35:38+5:302021-05-27T04:35:38+5:30
बीड : एकीकडे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने होम आयसोलेशन बंद केले आहे. दुसरीकडे ३४ लोक कसलीही परवानगी न घेता ...
बीड : एकीकडे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने होम आयसोलेशन बंद केले आहे. दुसरीकडे ३४ लोक कसलीही परवानगी न घेता होम आयसोलेशनमध्ये राहिले. एवढेच नव्हे, तर ते गावात सर्वत्र फिरले. हा प्रकार निदर्शनास येताच ग्रामसेवक व सरपंचाला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नाेटीस बजावली आहे. हा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यातील देविनिमगाव येथे घडला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या आटाेक्यात आणण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश येत आहे. कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यातच काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने कोरोनाबाधितांना होम आयसोलेशनची परवानगी बंद केली आहे. बाधितांना गावातच शाळा अथवा इतर शासकीय इमारतीत क्वारंटाईन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिलेले आहेत. अशातच आष्टीच्या देविनिमगावात मागील १० दिवसात तब्बल ४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील केवळ ९ रुग्णच नियमाप्रमाणे क्वारंटाईन झाले असून इतर ३४ रुग्ण अनधिकृतपणे होम आयसोलेट झाले. एवढेच नव्हे, तर ते घरात न थांबता गावभर फिरल्याचे आरोग्य पथकाच्या पाहणीत समोर आलेले आहे. यामुळे गावात संसर्ग वाढला असून रोज बाधितांची संख्या वाढत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत आष्टीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी देविनिमगावचे सरपंच आणि ग्रामसेवकाला नोटीस बजावली आहे. या गंभीर प्रकाराने खळबळ उडाली आहे.
डीएचओंकडून आष्टीचा आढावा
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार हे बुधवारी दिवसभर आष्टी तालुक्यात ठाण मांडून होते. प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आढावा घेण्यासह त्यांनी काही गावांना भेटी दिल्या. ज्या ठिकाणी त्रुटी दिसल्या, त्या सुधारण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, चार दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईमुळे कोविड सेंटरची परिस्थिती समाधानकारक होती.