योगेश्वरीच्या महाद्वाराचे दर्शन घेऊन भाविक परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:33 AM2021-04-10T04:33:00+5:302021-04-10T04:33:00+5:30
अंबाजोगाई : श्री क्षेत्र अंबाजोगाई येथील श्री. योगेश्वरी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आल्यानंतरही शुक्रवारी अनेक महिला व भाविक ...
अंबाजोगाई : श्री क्षेत्र अंबाजोगाई येथील श्री. योगेश्वरी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आल्यानंतरही शुक्रवारी अनेक महिला व भाविक दर्शनासाठी येत होते. सुरक्षारक्षकांनी प्रतिबंध करूनही भाविक लांबूनच का होईना महाद्वाराचे दर्शन घेऊन परतत होते.
महाराष्ट्रातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षात ही गुढीपाडवा ते दिवाळी या कालावधीतही मंदिर बंदच होते. गेल्या अडीच महिन्यात मंदिर सुरू असले तरीही भाविकांची दर्शन व्यवस्था मंदिराच्या गाभाऱ्यापासून वीस फूट अंतरावर होती. आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मंगळवार व शुक्रवार हे दोन देवीचे वार आहेत. दर्शनाचा अनेकांचा नित्यकर्म असल्याने शुक्रवारीही अनेक महिला व भाविक दर्शनासाठी आले होते. सुरक्षारक्षकांनी या भाविकांना प्रतिबंध केला तरीही भाविक महाद्वाराचे दर्शन घेऊन परतत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षात बहुतांश कालावधीत मंदिर बंदच राहिले. याचा मोठा फटका या परिसरातील छोट्या व्यापाऱ्यांना बसला आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात रोडावल्यामुळे या परिसरातील सर्वच व्यवसाय संकटात सापडले आहेत.
===Photopath===
090421\fb_img_1608752697008_14.jpg