श्री क्षेत्र भगवानगडावर भक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:56 PM2019-01-21T23:56:40+5:302019-01-21T23:58:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांच्या ५४ व्या पुण्यतिथीसाठी सोमवारी राज्यभरातून भगवान भक्तांची मांदियाळी गडावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांच्या ५४ व्या पुण्यतिथीसाठी सोमवारी राज्यभरातून भगवान भक्तांची मांदियाळी गडावर दाखल झाली होती. लाखो मस्तक बाबांच्या समाधीवर नतमस्तक झाले तर सकाळपासूनच गडाचे रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या हस्ते समाधीचा महाभिषेक केला गेला. तर गडाचा रुबाबदार अश्व, बाबांच्या पादुकासह प्रतिमेची प्रदक्षिणा व कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्याचे काम भगवान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.
बाबा त्या काळी घोड्याच्या टांग्यात प्रवास करायचे तो टांगा आज संभाळून ठेवला. त्याचे कारण सांगताना या टांग्याने संपूर्ण महाराष्ट्र जागा केल्याचे सांगितले. आईचा मोठेपणा लहान मुलाला कळत नाही तसेच संताचा मोठेपणा कळत नसल्याचे सांगितले. संतांना जवळच्यांनीच त्रास दिला तीच परंपरा आजही चालू आहे. पण संत त्या त्रासाला समोर हसत खेळत सामोरे जातात म्हणूनच ते गेल्यानंतर आपण त्यांचे स्मरण ठेवतो आणि त्यांच्यावरच्या श्रध्देनेच कल्याण होते हा विश्वास डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केला.
या वेळी आचार्य नारायण स्वामी, सिध्देश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री, भगवान महाराज रजपूत (वडवणी), राधाताई महाराज (पाटोदा), रामगिरी महाराज (येळी) बाबासाहेब महाराज बडे आदींची उपस्थिती व लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
पुढील पुण्यतिथीसाठी अनेकांनी आपले योगदान जाहीर केले. गादीघर ते समाधीस्थळ आकर्षक रांगोळीने सजवले गेले होते. बाबांच्या दर्शनानंतर भाविक कृतार्थ झाले होते.
नामदेव शास्त्री : दुसऱ्याची निंदा करू नका
कीर्तनप्रसंगी ‘संताचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकाचे काम नाही येथे ।।’ या अभंगावर बोलताना डॉ. नामदेव शास्त्री यांनी संतांचा महिमा सांगितला.
आपला मेंदू दुसºयाची निंदा करण्यासाठी व्यर्थ घालू नका. ज्ञानेश्वरांनी वाळवंटात कीर्तन करुन जातीपातीच्या शृंखला तोडल्या. तेच काम संत भगवान बाबांनी केले. संपूर्ण आयुष्य ज्ञानेश्वरीसाठी जगले त्यांचे नाव भगवानबाबा. म्हणूनच गडावर ज्ञानेश्वरीचे अध्ययन सुरु आहे. चाळीस मुलांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली हे भगवान बाबांचे वैभव आहे, असे असे डॉ. नामदेवशास्त्री म्हणाले.